राधानगरी टूरिझम अँड्रॉइड अॅपचे लोकर्पण, बायसन नेचर क्लबचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 05:04 PM2017-12-04T17:04:17+5:302017-12-04T17:11:51+5:30
राधानगरीच्या विकासासाठी पर्यटन हा मुख्य दुवा असून राधानगरी हे भविष्य काळातील देशातील सर्वोतम पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल असा आशावाद युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.न्यू पॅलेस येथे बायसन नेचर क्लबवतीने राधानगरी टूरिझम या अँड्रॉइड अॅपचा लोकर्पण सोहळा सोमवारी पार पडला. युवराज मालोजीराजे यांच्या हस्ते या अॅपचे लोकर्पण करण्यात आले.
कोल्हापूर, दि. ४ : राधानगरीच्या विकासासाठी पर्यटन हा मुख्य दुवा असून राधानगरी हे भविष्य काळातील देशातील सर्वोतम पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल असा आशावाद युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.
न्यू पॅलेस येथे बायसन नेचर क्लबवतीने राधानगरी टूरिझम या अँड्रॉइड अॅपचा लोकर्पण सोहळा सोमवारी पार पडला. युवराज मालोजीराजे यांच्या हस्ते या अॅपचे लोकर्पण करण्यात आले.
यावेळी मालोजीराजे यांनी राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती व सर्व छत्रपती कुटूंबियांकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे यांनी लवकरच राधानगरी येथे पर्यटन महामहोत्सव आयोजीत करणार असल्याची घोषणा केली.
ऋतूराज इंगळे यांनी राधानगरी हा शाहू महाराजांचा सर्वात आवडता भाग होता, त्यामुळे राधानगरी परिसरातील शाहुकालीन वास्तूचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची मागणी केली.
यावेळी राधानगरी टूरिझम अॅपची निर्मिती करणाऱ्या विशाल घोलकर या विद्यार्थ्याचा बायसन नेचर क्लबतर्फे सत्कार करण्यात आला. हे राधानगरी पर्यटन अॅप हे विनामूल्य असून त्याचा राधानगरीमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रुपेश बोंबाडे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांनी केले तर आभार अतुल बोबाडे यांनी मानले. या कार्यक्रमास राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी, उपसरपंच सचिन पालकर, माजी सरपंच प्रकाश चांदम, बायसन नेचर क्लबचे दर्शन निल्ले, किरण सावंत, सर्वज्ञ केरकर, सनथ केरकर, उमेश डब्बे, किरण पारकर, कपिल पारकर, गणेश डब्बे, मिलिंद पारकर यांच्यासह सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.