राधानगरीचे तीन दरवाजे खुले: पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 04:19 PM2019-07-31T16:19:48+5:302019-07-31T16:23:46+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाने काहीसी उसंत घेतली असली तरी पूर स्थिती कायम आहे. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने पूराच्या पाण्याची फूग कायम राहणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाने काहीसी उसंत घेतली असली तरी पूर स्थिती कायम आहे. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने पूराच्या पाण्याची फूग कायम राहणार आहे.
गेली दोन दिवस जिल्ह्यात धुवादार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणक्षेत्रातही मुसळदार पाऊस असल्याने धरणातून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाण्याची पातळीत झपाट्याने वाढत आहे. पंचगंगेचने ३९ फुटाची इशारा पातळी ओलांडत धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे.
बुधवारी पावसाचा जोर जरी कमी असला तरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने पुराच्या पाण्याची फूग कायम राहणार आहे. ८१ बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्याची वहातूक पुर्णपणे विस्कळीत झाली आहे. इतर जिल्हा मार्ग २१, ग्रामीम मार्ग २४ असे ४५ मार्गावरील वहातूक विस्कळीत झाली असून यापैकी ९ मार्गावरील वहातूक पुर्णपणे खंडीत झाली आहे.
राधानगरी धरण मंगळवारी रात्री भरल्यानंतर बुधवारी सकाळ पासून क्रमांक ३,५ व ६ असे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. यातून प्रतिसेकंद ४२८४ तर वीज निर्मितीसाठी १४०० असे प्रतिसेकंद ५६८४ घनफुट पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने या नदीचे पाणी विस्तीर्ण पसरले आहे.