राधानगरी सभापतिपदी खामकर

By Admin | Published: October 9, 2015 11:20 PM2015-10-09T23:20:14+5:302015-10-09T23:20:14+5:30

उपसभापतिपदी संगीता कांबळे : काँग्रेस-राष्ट्रवादीतील समझोत्यानुसार निवडी

Radhanagi presidential vacancies | राधानगरी सभापतिपदी खामकर

राधानगरी सभापतिपदी खामकर

googlenewsNext

राधानगरी : राधानगरी पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे जयसिंग हिंदुराव खामकर व उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्या संगीता मच्छिंद्रनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. खामकर हे धामोड पंचायत समिती गटातून सदस्य असून, ते तिसावे सभापती आहेत. तर संगीता कांबळे या राशिवडे गटातील सदस्य असून, त्या एकोणतिसाव्या उपसभापती आहेत. एकाचवेळी दोन्ही पदे धामोड खोऱ्यात गेली आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाड्यांना बहुमत न मिळाल्याने झालेल्या समझोत्यानुसार दोन्ही पक्षांनी केलेल्या पदांच्या वाटणीनुसार यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली होती. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची गुरुवारी कोल्हापुरात बैठक झाली. या बैठकीत सभापतिपदासाठी खामकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी संगीता कांबळे यांचे नाव उपसभापतिपदासाठी निश्चित केले. यानुसार शुक्रवारी सकाळी अकरा वाजता या दोघांचेच अर्ज दाखल झाले. दोन वाजता झालेल्या सभेत सभाअध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. सभेला पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर झालेल्या कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, भोगावतीचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, सदाशिव चरापले, विजयसिह मोरे, पी. डी. धुंदरे, विश्वनाथ पाटील, प्रा. किसन चौगले, नंदकिशोर सूर्यवंशी, के. एल. पाटील, एल. एस. पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.
राधानगरी पंचायत समिती सभापतिपदी जयसिंग खामकर यांची बिनविरोध निवड झाल्याने धामोड परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. सुमारे वीस वर्षांनंतर या परिसराला सभापतिपदाची संधी मिळाली आहे. काहीसा मागास व दुर्गम असणाऱ्या परिसरात या पदामुळे विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. यावेळी खामकर यांची मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

वीस वर्षानंतर धामोडला संधी
नूतन सभापती खामकर यांचे आजोबा कै. अंबाजी खामकर यांनी १९७३/ ७४ या काळात सभापती पद भूषविले आहे. तर कै. आण्णासाहेब नवणे यांच्यानंतर वीस वर्षांनी पुन्हा धामोड भागाला संधी मिळाली आहे.

Web Title: Radhanagi presidential vacancies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.