गंगा नदी स्वच्छतेसाठी किरणोत्साराचे तंत्रज्ञान
By admin | Published: January 29, 2016 12:53 AM2016-01-29T00:53:03+5:302016-01-29T00:54:50+5:30
आर. भट्टाचार्य : भाभा अणुसंशोधन केंद्राचा प्रस्ताव
कोल्हापूर : किरणोत्सार तंत्रज्ञानाचा वापर आता गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी वापर केला जाणार आहे. केंद्र सरकारला भाभा अणुसंशोधन केंद्रातर्फे याचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती अॅटोमिक एनर्जी रेग्युलेशन बोर्डाचे उपाध्यक्ष डॉ. आर. भट्टाचार्य यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.डॉ. भट्टाचार्य म्हणाले, नियंत्रित किरणोत्साराचे दैनंदिन जीवनात अनेक लाभ घेत आहोत, विशेषत: अन्न प्रक्रिया उद्योगाला याचा मोठा फायदा झाला आहे. किरणोत्साराच्या विविध घटक वर्गीकरण तंत्रज्ञानाचा वापर करून टप्प्या-टप्प्याने गंगा नदीचे शुद्धिकरण केले जाईल. त्यात किरणोत्सारचा वापर करून प्रदूषित पाण्यातील जीवाणूंना नष्ट केले जाईल. त्यामुळे पाणी शुद्ध होईल शिवाय उर्वरित अन्य घनपदार्थ शेती तसेच अन्य उपयोगांसाठी वापरता येईल. हे तंत्रज्ञान देशातील अन्य नद्यांच्या शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे. अणुऊर्जा निर्मितीसाठी देशातील युरेनियमची उपलब्धता लक्षात घेऊन संबंधित ऊर्जा निर्मितीसाठी थेरियमचा वापर केला जाईल.
आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ. एम. राजकुमार म्हणाले, किरणोत्सार आणि नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान हे केवळ रोगनिदानासाठीच नव्हे, तर उपचारासाठी वरदायी ठरले आहे. कर्करोगाच्या विविध प्रकारच्या पेशींना नष्ट करण्यासाठी नॅनो विज्ञानाधारित औषधे महत्त्वाची ठरत आहेत. मानवी मेंदू आणि हृदय यांचे स्नायू पुनर्निर्मितीक्षम नाहीत. मात्र, नॅनो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊती संवधर्नाद्वारे ही क्षमता निर्माण करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
भाभा अणु संशोधन केंद्राच्या कुंडकुलम एक्स्पर्ट ग्रुपच्या एक्सिलेटर सेफ्टी समितीचे माजी प्रमुख प्रा. एम. आर. अय्यर म्हणाले, केरळच्या अणुऊर्जा प्रकल्पामधील किरणोत्साराची पातळी जास्त आहे. मात्र, या ठिकाणी सर्वेक्षण केले असता या ठिकाणी नागरिकांमध्ये शारीरिक व्यंग आढळलेले नाही; पण काही स्वरूपात गैरसमज पसरविले जातात. कमी पातळीवरील किरणोत्सार वैद्यकीय क्षेत्रात उपयुक्त ठरत आहे. या पत्रकार परिषदेस कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. सी. डी. लोखंडे, आर. जी. सोनकवडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)+
अणुऊर्जा निर्मिती सुरक्षित
जैतापूर, कर्नाकुलम्मध्ये अणुऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांबाबत काही लोकांकडून गैरसमज पसरविण्यात येत आहेत. देशातील अणुऊर्जा निर्मिती सुरक्षित आहे. त्याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे मत डॉ. भट्टाचार्य यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, सध्या देशात ज्या ठिकाणी अणुऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आहेत. त्यांची सुरक्षिततेच्यादृष्टीने वेळोवेळी तपासणी केली जाते. त्याचा वार्षिक अहवाल आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात येतो, असेही ते म्हणाले.