Maharashtra Vidhan Sabha 2019 : राफेलचे शस्त्रपूजन भारतीय संस्कृतीनुसारच : प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 04:04 PM2019-10-10T16:04:23+5:302019-10-10T16:07:06+5:30
राफेलचे शस्त्रपूजन हे भारतीय संस्कृतीनुसारच केले असल्याचे सांगून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची बाजू घेतली.
कोल्हापूर : राफेलचे शस्त्रपूजन हे भारतीय संस्कृतीनुसारच केले असल्याचे सांगून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची बाजू घेतली.
भाजपतर्फे आयोजित ‘कॉफी विथ यूथ’ या उपक्रमाअंतर्गत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज, गुरुवारी कोल्हापुरात आले होते. शिवाजी विद्यापीठाच्या मार्गावरील राम मंगल कार्यालयात सकाळी सावंत यांनी तरुणाईशी संवाद साधला. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राफेलचे पूजन करणे यात अंधश्रध्दा नाही. दसऱ्याला शस्त्रपूजन करणे ही भारतीय संस्कृतीच आहे, त्यामुळे यावर टीका करणे चुकीचे आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चांगले सरकार दिले आहे. महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांनी चांगले काम केले आहे. पहिल्या पाच वर्षातच त्यांनी केलेल्या कामांना आणखीन संधी देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री सावंत यांनी कोल्हापुरात शिक्षण घेतले आहे. ‘यूथ आयकॉन’ अशी त्यांची ओळख आहे. तरुणाईला डॉ. सावंत यांच्या जीवनपट जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे भाजपने ‘कॉफी विथ यूथ’ उपक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत डॉ. सावंत यांच्याशी तरुणाईने थेट संवाद साधला.
यावेळी भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.