राहुल आवाडेंचे बंड रात्रीत थंड : राजू शेट्टी यांच्या विजयासाठी झटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:04 AM2019-03-30T01:04:16+5:302019-03-30T01:04:54+5:30
आमच्या मनातील शंका दूर झाल्याने हातकणंगले मतदारसंघातून मी अर्ज भरणार नाही. महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती
कोल्हापूर : आमच्या मनातील शंका दूर झाल्याने हातकणंगले मतदारसंघातून मी अर्ज भरणार नाही. महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे यांनी सोमवारी (दि. १) हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केल्याने आघाडीत खळबळ उडाली होती. गुरुवारी (दि. २८) दिवसभर आघाडीत यावर उलटसुलट चर्चा झाली. रात्री बारा वाजता खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे यांची बैठक होऊन निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. अवघ्या एका रात्रीत राहुल आवाडेंचे बंड थंड झाले असले तरी दोन्ही कॉँग्रेसच्या पातळीवर त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यासाठी प्रकाश आवाडे यांना शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन बंड शमल्याचे सांगावे लागले.
राहुल म्हणाले, ‘हातकणंगले मतदारसंघात कॉँग्रेस व आवाडे गटाची मोठी ताकद आहे; पण अनवधानाने असेल; काही चुका झाल्याने आवाडे गटाचे तरुण कार्यकर्ते दुखावले होते. त्यातून आपण ‘हातकणंगले’तून उमेदवारी करावी, असा कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने उमेदवारीची घोषणा केली; पण या चुकांमध्ये सुधारणा झाल्याने उमेदवारीचा निर्णय मागे घेतला आहे. आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्यामागे ठाम राहणार आहे.
येडेमच्छिंद्रला निमंत्रण नव्हते
खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचाराचा प्रारंभ येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथून करण्यात आला. कॉँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपणासह कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी निमंत्रित करणे गरजेचे होते; पण त्यांनी आम्हाला बोलवले नाही ही वस्तूस्थिती आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहण्यासाठी शेट्टी यांनी मला फोन केला होता, त्यावेळी आपण मुंबईत होतो, असा खुलासाही प्रकाश आवाडे यांनी केला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी हातकणंगले मतदारसंघातून बंडखोरी करण्याची घोषणा गुरुवारी केल्याने खळबळ उडाली होती; पण रात्रीत यू टर्न घेत त्यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याची घोषणा राहुल आवाडे व प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी कॉँग्रेस कमिटीत केली.