मतदार यादीतील घोळ संपेपर्यंत निवडणूक नको भाजपचे राहुल चिकोडे : निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:31 AM2021-02-25T04:31:31+5:302021-02-25T04:31:31+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यावरील तक्रारींचा घोळ संपत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यावरील तक्रारींचा घोळ संपत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी तक्रार भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यादीतील गोंधळ केवळ एक-दोन प्रभागांपुरता मर्यादित नसून शहरातील बहुतेक सर्वच प्रभागांच्या प्रारूप याद्यात हे घडले आहे. प्रभाग क्रमांक ३२ मध्ये २१६३, प्रभाग क्रमांक ३३ मध्ये सुमारे २१००, तर प्रभाग क्रमांक ४८ मध्ये सुमारे १८०० नावांवर हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदविल्या आहेत. तक्रारी पाहता प्रशासनाने सध्याच्या प्रारूप याद्या पूर्णपणे रद्द करून नवीन प्रारूप याद्या कराव्यात, अशी मागणी आहे. प्रारूप याद्यांवर हरकत दाखल करण्याची मुदत नवीन याद्या जाहीर झाल्याच्या दिवसापासून पुढे सुट्टीचे दिवस सोडून किमान दहा दिवस ठेवावी. याद्यांचे प्रत्येक वॉर्ड स्तरावर जाहीर वाचन करावे व नागरिकांपर्यंत त्याचा कार्यक्रम पोहोचवावा. प्रारूप याद्या करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.