अध्यक्षपदासाठी राहुल पाटील आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:09+5:302021-07-12T04:17:09+5:30

शुक्रवारपासूनच महाविकास आघाडीचे सदस्य पन्हाळ्यावर आहेत. रविवारी संध्याकाळी पाच वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय ...

Rahul Patil in the lead for the post of President | अध्यक्षपदासाठी राहुल पाटील आघाडीवर

अध्यक्षपदासाठी राहुल पाटील आघाडीवर

Next

शुक्रवारपासूनच महाविकास आघाडीचे सदस्य पन्हाळ्यावर आहेत. रविवारी संध्याकाळी पाच वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी आपापल्या पक्षांच्या सदस्यांच्या मुलाखती घेतल्या.

दरम्यान, या सर्व चर्चेचा सूर पाहता अध्यक्षपद काँग्रेसकडे राहण्याची शक्यता असून राहुल पाटील यांचे नाव आघाडीवर आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी आणि विजय बोरगे यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. या सर्व सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर प्रमुख नेत्यांनी सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले.

पत्रकारांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, आम्ही सर्व सदस्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृहावर सर्व नेतेमंडळी एकत्र येणार आहेत. या ठिकाणी नाव निश्चित केले जाईल आणि त्यानुसार अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, आमच्या सर्वांमध्ये चर्चा सुरू आहे. उद्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर सभापतिपदांसाठीचा निर्णय घेतला जाईल. आमच्यात जो काही निर्णय होईल तो एकमताने होईल. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, भय्या माने, जालंदर पाटील, सावकर मादनाईक आदी उपस्थित होते.

चौकट

तुम्ही निर्णय घेईल तो मान्य

दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांच्या मुलाखतीवेळी अनेकांची कोंडी झाली. काँग्रेसच्या मुलाखती सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांनी घेतल्या. यावेळी अध्यक्षपद काँग्रेसकडे राहावे, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली तर पी. एन. पाटील यांच्या गटाच्या सदस्यांसह अन्य काहींनी राहुल पाटील यांना अध्यक्षपद द्या अशी मागणी केली तर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अध्यक्षपद राष्ट्रवादीने सोडू नये, अशा अपेक्षा व्यक्त केल्या. कागल तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी युवराज पाटील यांना अध्यक्षपद देण्याची मागणी केली. अनेकांनी साहेब, तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य, असे सांगून आपली सुटका करून घेतली.

चौकट

भाजपचे सदस्य सहलीवरून घरी

एकीकडे राहुल पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे भाजपच्या सदस्यांची कोल्हापुरात एका हॉटेलवर बैठक सुरू होती. या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे उपस्थित होते. हे सर्वजण गणपतीपुळेहून कोल्हापुरात आले होते. सोमवारी सकाळी ९ वाजता पुन्हा या सर्वांना हॉटेलवर बोलावण्यात आले आहे. त्या ठिकाणी निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येणार आहे. याच ठिकाणी ‘जनसुराज्य’च्या सदस्यांनाही बोलावण्यात आले आहे.

चौकट

प्रकाश आवाडे यांचा राहुल पाटील यांना पाठिंबा

आमदार प्रकाश आवाडे यांच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी राहुल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्यावतीने माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी याबाबतची माहिती दिली. मतदानावेळी आवाडे गटाचे दोन सदस्य राहुल पाटील उमेदवार असतील तर त्यांना मतदान करतील, असे त्यांनी सांगितले.

११०७२०२१ कोल झेडपी ०१

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी पन्हाळ्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली.

Web Title: Rahul Patil in the lead for the post of President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.