राहुल रेखावार कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:13+5:302021-07-14T04:30:13+5:30

कोल्हापूर : अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) चे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी ...

Rahul Rekhawar is the new District Collector of Kolhapur | राहुल रेखावार कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी

राहुल रेखावार कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी

Next

कोल्हापूर : अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) चे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. विद्यमान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सहसचिव म्हणून बदली झाली आहे. महापूर, कोरोना सारख्या आपत्तीत कोल्हापूरकरांची काळजी तसेच सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत त्यांनी करवीरवासीयांच्या कायम लक्षात राहील इतके चांगले काम गेल्या अडीच वर्षांत केले. सेवेतील त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने मंगळवारी रात्री शासनाच्या वतीने या बदल्या जाहीर करण्यात आल्या.

राहुल रेखावार हे मूळचे खडकी बाजार, (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील असून त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथील पीपल्स हायस्कूलमध्ये झाले. बारावीत ते बोर्डात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी राजस्थानमधील पिलानी येथे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयात अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतले. त्यानंतर भाभा अणुशक्ती केंद्रात काम केले. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्येही त्यांनी कामाचा अनुभव घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे २०११ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ते देशात १५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ऑगस्ट २०१२ मध्ये ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. एक वर्षाने गडचिरोलीत सहायक जिल्हाधिकारी व तेथील इटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी म्हणूनही काम केले. याच पदावर त्यांची २०१४ मध्ये नागपूरला बदली झाली. त्यानंतर त्यांनी हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी महापालिका आयुक्त धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे. जुलै २०१९मध्ये त्यांनी औरंगाबाद महावितरणमध्ये सहायक संचालक पदाची धुरा सांभाळली. बीडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय ठरली. आठ महिन्यांपूर्वी त्यांची अकोल्यात महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. शिस्तीचे व निर्भिड ,धडाकेबाज निर्णय घेणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

---

देसाई यांचे स्मरणात राहणारे काम

विद्यमान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या अडीच वर्षांत झोकून देऊन काम केले. रुजू झाल्यानंतर काही महिन्यातच आलेल्या महापूर काळात त्यांनी नागरिकांचे स्थलांतर, सोयी सुविधा, पुढे पुनर्वसनाची तातडीने कार्यवाही केली. गेल्यावर्षापासून सुरू झालेल्या कोरोना काळातही त्यांनी आपल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमधील अनुभव पणाला लावत यंत्रणेचे योग्य नियोजन करत पहिल्या लाटेतून कोल्हापूरला सुखरूप बाहेर काढले. सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेदरम्यानही त्यांनी परिस्थिती गंभीर होऊ दिली नाही,याशिवाय महसूल यंत्रणेतील कामात सुसूत्रता आणत सर्वसामान्यांच्या सोयीसाठी महसूल जत्रा सारखा अभिनव उपक्रम राबवला या अंतर्गत कूळ कायद्याचे कलम ४३ हटवणे, कुमरी शेतकऱ्यांना वनजमिनींचा वहिवाटीचा हक्क, शाहूवाडीतील मौजे मरळे येथील कुटुंबांना, हेरसरंजाम येथील नागरिकांना मालकी हक्काने जमीन, मातंग वसाहतीतील ४०० भूखंड त्यांच्या मालकीचे करणे यासह अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या काळात घेतले. कोल्हापूरकरांच्या कायम स्मरणात राहील इतके चांगले काम त्यांनी केले.

---

राहूल रेखावार यांचा फोटो सिटी फोटोला सेव्ह आहे. जिल्हाधिकारी देसाई यांचाही फोटो वापरावा

Web Title: Rahul Rekhawar is the new District Collector of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.