राहुल, सुशांतला पाहिजे पालकत्वाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:02 AM2019-04-10T00:02:13+5:302019-04-10T00:02:18+5:30
निवास वरपे । लोकमत न्यूज नेटवर्क म्हालसवडे : दोन्ही भाऊ जन्मल्यापासून मतिमंद, घरी अठरा विश्व दारिद्र्य, त्यातच वीस वर्षे ...
निवास वरपे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हालसवडे : दोन्ही भाऊ जन्मल्यापासून मतिमंद, घरी अठरा विश्व दारिद्र्य, त्यातच वीस वर्षे वयाची बहीणही कायम आजारी. राहुल (वय २३) व सुशांत (१७) या दोन्ही भांवडांकरिता वयोवृद्ध झालेल्या आई-वडिलांना मुलांच्या भवितव्याची चिंता सतावतेय. ही आहे भोगमवाडी (ता. करवीर) येथील मोलमजुरी करून चरितार्थ चालविणाऱ्या शामराव विष्णू भोगम यांच्या कुटुंंबाची व्यथा.
भोगमवाडी हे दुर्गम व डोंगराळ भागातील छोटस गाव. येथील भारती व शामराव भोगम हे वयोवृद्ध दाम्पत्य आपल्या मतिमंद मुलांच्या भवितव्यासाठी चिंताग्रस्त बनले आहे. त्यांची दोन्ही मुले जन्मताच मंतिमंद आहेत. त्यात मुलगीही कायम आजारी असते. सध्या त्यांची मुलगी व लहान मुलगा सुशांत यांना कायमस्वरूपी सुरू असलेले उपचार व खर्चिक तपासण्या करणे त्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे.
भोगम दाम्पत्य रोजगारानिमित्त घराबाहेर गेले की, घरात मुलांची काळजी घ्यायला कोणी नसते. त्यांची मतिमंद मुले अचानक घरातून बाहेर पडली की वाट दिसेल तिकडे चालू लागतात. येथील ग्रामस्थ त्यांना यथायोग्य सहकार्य करीत असतात.
पालकांकडून या मुलांच्या आजार आणि उपचाराला आर्थिक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.