राहुल सुतार यांचे जर्नी आॅफ नेचर ‘जहाँगीर’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:36 PM2019-06-12T12:36:12+5:302019-06-12T12:41:05+5:30
कोल्हापूर येथील नव्या पिढीतील चित्रकार राहुल संजय सुतार यांच्या ‘जर्नी आॅफ नेचर’ हे चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत १७ ते २३ जूनदरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
कोल्हापूर : येथील नव्या पिढीतील चित्रकार राहुल संजय सुतार यांच्या ‘जर्नी आॅफ नेचर’ हे चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत १७ ते २३ जूनदरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
मूळचे आरे (ता. करवीर) येथील राहुल यांना बालपणापासूनच चित्रकला, निसर्ग आणि चित्रकलेची आवड होती. त्यांना वडिलांकडूनही चित्रकलेचे संस्कार मिळाले. या कलेला अभ्यासाची जोड देत त्यांनी कलानिकेतनमधून एटीडीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. निसर्गातील विविध रंग, आकार, प्रकाश, अवकाश, पाणी हा आविष्कार त्यांनी चित्रांद्वारे कॅनव्हासवर रेखाटला.
अत्यंत खडतर परिस्थितीतून केवळ जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी चित्रकलेत आपली स्वतंत्र शैली निर्माण केली आहे. यापूर्वी त्यांनी शाहू स्मारक, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे स्वतंत्र प्रदर्शने आयोजित केली आहेत.
याशिवाय शासनाचे राज्य कलाप्रदर्शन, लोकमान्य टिळक चित्र प्रदर्शन, कोल्हापूर कलामहोत्सव अशा प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. अवकाशाचे बदलते रंग, लँडस्केप, डोंगरदऱ्या, नदी, अशा रितीने जणू निसर्गाशी संवाद साधत त्यांनी चित्रे रेखाटली आहेत. एका छोट्याशा खेड्यातील फारशी साधने नसताना अंगभूत कौशल्याच्या जीवावर राहूल यांने घेतलेली झेप नक्कीच प्रेरणादायी आहे.