Kolhapur News: गर्भलिंग चाचणीतील रिपोर्ट कोडवर्डमध्ये, स्टिंग ऑपरेशननंतर धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 05:26 PM2023-06-13T17:26:01+5:302023-06-13T17:28:42+5:30
कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यावर कायदेशीररीत्या निर्बंध असले तरी, छुप्या पद्धतीने हे प्रकार सुरूच आहेत. यातून लाखो ...
कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यावर कायदेशीररीत्या निर्बंध असले तरी, छुप्या पद्धतीने हे प्रकार सुरूच आहेत. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा प्रकार सोमवारी (दि. १२) राजारामपुरीतील श्री हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये झालेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला. इथे गर्भलिंग चाचणीसाठी १५ हजार रुपये तर, गर्भपातासाठी २० हजार रुपयांचा दर होता, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
सहा महिन्यांपूर्वीच राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील दोन रॅकेटचे कारनामे उघडकीस आल्यानंतर अवैध गर्भलिंग निदान करण्याचे प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, शासकीय आरोग्य यंत्रणांची दिशाभूल करून बेकायदेशीर गर्भलिंग निदान करण्याचे प्रकार सुरूच आहेत. राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी जाणाऱ्या तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एक मुलगी आहे.
आठ दिवसांपूर्वी नियमित तपासणीसाठी गेल्यानंतर हॉस्पिटलमधील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी त्यांना गर्भलिंग निदान करण्याचा पर्याय सूचवला. त्यासाठी १५ हजार रुपये लागतील, असे सांगितले. तसेच मुलगी झाली तर २० हजार रुपयांत गर्भपाताचीही सोय असल्याचे सांगितले. हा धक्कादायक प्रकार ऐकल्यानंतर तक्रारदार महिलेने प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक समितीच्या सदस्य गीता हासूरकर यांच्याकडे धाव घेऊन तक्रार दिली.
हासूरकर यांनी तक्रारदार महिलेच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन करून श्री हॉस्पिटलचा भंडाफोड केला. हॉस्पिटलचे पॉझिटिव्ह, निगेटिव्हचे कोडवर्डही समोर आले. महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासणीदरम्यान श्री हॉस्पिटलच्या दैनंदिन कामात अनेक त्रुटी आढळल्या. तक्रारदार महिलेचा केसपेपर तयार केला नव्हता. अनेक रुग्णांच्या नोंदी ठेवलेल्या नाहीत. रुग्णांची माहिती देण्यास कर्मचाऱ्यांनी चालढकल केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे काही काळ बंद होते. डॉ. वालावलकर आणि हॉस्पिटल स्टाफच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याचे हासूरकर यांनी सांगितले.
मशीन बंद असल्याचा कांगावा
वर्षभरापासून सोनोग्राफी मशीन बंद असल्यामुळे आमच्याकडे सोनोग्राफी होत नाही. आम्ही कोणाचीही सोनोग्राफी केलेली नाही. रुग्णाच्या समाधानासाठी त्यांची तपासणी केली. असा कांगावा डॉ. वालावलकर यांनी तपासणीदरम्यान केला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मशीन इंजिनिअरला बोलवून मशीनची तपासणी केली. त्यानंतर मशीन सील करण्यात आले.
अन्य रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण
स्टिंग ऑपरेशननंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आणि प्रसारमाध्यमांचे कॅमेरे हॉस्पिटलमध्ये पोहोचताच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक घाबरले. पोलिसांनी रुग्णांची नावे लिहून घेताच काही रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनी काढता पाय घेतला. अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कर्मचाऱ्यांना घाम फुटला.