साखर कारखान्याच्या गोडाऊनवर धाडी टाका, राजू शेट्टींची जीएसटी विभागाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 05:09 PM2022-08-08T17:09:53+5:302022-08-08T17:10:20+5:30
उसात काटामारी करून राज्यात सरासरी 4581 कोटींचा दरोडा टाकला जात आहे.
कोल्हापूर: राज्यातील अनेक साखर कारखाने काटामारी करून शेतकर्यांची फसवणूक करत आहेत. काटामारी करून साखरेची चोरी केली जात आहे. जीएसटी न भरता साखरेची परस्पर विक्री होत असून तातडीने साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर धाडी टाकून तपासणी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जीएसटीचे सहआयुक्त वैशाली काशीद यांचेकडे केली.
राज्यामधील साखर कारखाने ऊसाचे वजन करताना सर्रास काटामारी करतात. एकूण वजनाच्या 10 टक्के इतकी काटामारी केली जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. यातून केवळ शेतकर्यांचेच नुकसान होत नसून उत्पादीत झालेली साखर चोरून विकली जात असल्याने त्यावरील जीएसटी बुडवल्याने शासनाचेही नुकसान होते.
महाराष्ट्रात गेल्यावर्षी 13 कोटी 20 लाख टन इतक्या उसाचे उत्पादन झाले. त्याच्या 10 टक्के म्हणजे 1 कोटी 32 लाख टन उसाची चोरी झाली, व त्यापासून उत्पादीत झालेली 14.78 लाख टन साखर विना जीएसटी विकली गेली आणि त्यामुळे 229 कोटी रूपयांचा जीएसटी बुडवला गेला.
कोल्हापूर विभागात 2 कोटी 55 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून 25 लाख 50 हजार टन ऊस काटामारीतून चोरला गेला. त्यापासून तयार झालेली 3 लाख 16 हजार टन साखर चोरून विकली गेली यामधून 48.90 कोटी रूपयांचा जीएसटी बुडाला. उसात काटामारी करून राज्यात सरासरी 4581 कोटींचा दरोडा टाकला जात आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर अचानक धाडी टाकून त्यांचे हिशेब तपासावेत. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे उपस्थित होते.