कोल्हापूर जिल्ह्यातील १५ रुग्णालयांवर छापे; गर्भपात आणि अर्भक विक्री होत असल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:41 AM2018-11-14T00:41:54+5:302018-11-14T00:42:03+5:30
कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भपात आणि अर्भक विक्री होत असल्याच्या संशयावरून कोल्हापूर जिल्ह्यातील १५ रुग्णालयांवर मंगळवारी छापे टाकण्यात आले. केंद्र ...
कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भपात आणि अर्भक विक्री होत असल्याच्या संशयावरून कोल्हापूर जिल्ह्यातील १५ रुग्णालयांवर मंगळवारी छापे टाकण्यात आले. केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, काही ठिकाणी धक्कादायक माहिती मिळाल्याचे समजते. यात कोल्हापुरातील काही नामवंत रुग्णालयांचा समावेश असल्याचे कळते.
सहा महिन्यांपूर्वी इचलकरंजीतील डॉ. अरुण पाटील यांच्या रुग्णालयातून नवजात अर्भकांची विक्री होत असल्याच्या संशयावरून तेथे छापा टाकण्यात आला होता. पाटील आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन जी चौकशी करण्यात आली होती. त्याच्याच आधारे मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत हे छापे टाकण्यात आले. त्यांमध्ये बेकायदेशीर गर्भपात केले जातात का?, अर्भकांची विक्री होते का? याची चौकशी करण्यात आली. प्रसूतीसाठी येणाºया महिला, त्यांचे वय, आधार कार्ड, जन्मतारीख या सर्व नोंदीची तपासणी करण्यात आली. त्यात काही रुग्णालयात १८ वर्षांच्या गर्भवतींची प्रसूती केल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे कळते.
‘महात्मा फुले’नंतर दणका
गेल्याच महिन्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समावेश असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी रुग्णालयांवर छापे टाकून कडक कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये काही रुग्णालयांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने ही कारवाई झाल्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.