मुश्रीफांना घाबरलो नसतो तर ‘क्रांती’ विजयी झाला असता; ‘शेकाप’च्या जयंत पाटलाचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 04:20 PM2023-01-29T16:20:59+5:302023-01-29T16:21:49+5:30
"सतेज पाटील, तुम्ही इकडे-तिकडे करू नका"
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना घाबरलो नसतो, तर क्रांतीसिंह पवार हा विजयी झाला असता, असा गौप्यस्फोट करत सतेज पाटील तुम्ही इकडे-तिकडे करू नका, ‘रायगड’मध्ये तुमचे काही नसताना आम्ही पदे देतो, तुम्ही येथे सोबत घ्या, असा टोला ‘शेकाप’चे आमदार जयंत पाटील यांनी लगावला. माजी आमदार संपतराव पवार यांच्या अमृतमहोत्सवी समारंभात ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, जिल्हा बँकेला ‘क्रांती’ला माघार घेण्यासाठी हसन मुश्रीफ यांचा फोन आला होता. ‘क्रांती’ ऐकत नसल्याचे मी त्यांना सांगितले. मुश्रीफ व माझी जुनी मैत्री असल्याने त्यांच्याविरोधात येथे काम करता येत नव्हते. तरीही १७५ मतांनी पराभव झाला, मी येथे जरा टेकू दिला असता तर क्रांती निवडून आला असता, मात्र आपण मुश्रीफ यांना घाबरलो. ‘क्रांती’ने आपली चुणूक दाखविली, आता थांबायचे नाही, उद्याच्या लढाईसाठी तयार रहा.
कोल्हापुरात आलो की शाहू महाराजांची स्फूर्ती मिळते, मात्र अलीकडे पुरोगामी जिल्ह्यात प्रतिगाम्यांची शक्ती वाढत असून, त्यांचे आमदार, खासदार निवडून येत असल्याचे दुख होते. सतेज पाटील तुम्ही इकडे-तिकडे करू नका, आम्ही मात्र विचारांवर ठाम असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
लोकप्रबोधनासाठी लढणं, हे ‘बापू’कडून शिकलो
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वेगळे पॅनल केले आणि बापूंच्या भेटीला गेलो. ‘तुम्ही पॅनल केले नसते तर आम्ही लढायला तयार होतोच, जय-पराजयासाठी निवडणुका नसतात तर लोक प्रबोधनासाठी लढणं गरजेचे असते, हे बापूंनी त्यावेळी मला सांगितल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले.
रस्त्यावरच्या नेत्याला पुन्हा खुर्चीत बसवा
आजच्या राजकारणावर मार्मिक शब्दात प्रहार करता प्रा. शिवाजीराव भुकले म्हणाले, कोणतीही साधनसामुग्री नसताना १९९५ला बापूंनी जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर प्रस्तापित्यांविरोधात दंड थोपटले. पवारसाहेब तुमच्या स्पर्शाने अनेकांचे सोने झाले, मात्र ते चांदी करायला कोठे गेले? बापू, लोखंड व सोन्याच्या मधले आहेत, आता तुम्हीच ठरवा त्यांचा सन्मान कसा करायचा.
हद्दवाढीबाबत भूमिका बदला
संपतराव पवार, पी. एन. पाटील व चंद्रदीप नरके यांच्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ रखडली आहे. अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांनी हद्दवाढीबाबत आपल्या भूमिकेत किंचित बदल करावा. असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
बँकेच्या निवडणुकीत फटका अनुभवला
संपतराव पवार यांची सार्वजनिक जीवनात वेगळी प्रतिमा आहे, त्यांच्या भूमिकेचा फटका काय असतो, हे आम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनुभवल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.