कोल्हापूरची रेल्वे मालवाहतूक सेवा होणार भक्कम
By admin | Published: April 18, 2015 12:37 AM2015-04-18T00:37:19+5:302015-04-18T00:38:29+5:30
एस. के. तिवारी : चेंबर आॅफ कॉमर्समध्ये केली उद्योजक, व्यापाऱ्यांशी चर्चा
कोल्हापूर : अडचणी सोडवून कोल्हापूरची रेल्वे मालवाहतूक सेवा अधिक भक्कम करणार असल्याचे आश्वासन मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय (आॅपरेशन) व्यवस्थापक एस. के. तिवारी यांनी शुक्रवारी येथे दिले.
येथील कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सच्या शिवाजीराव देसाई सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक गौरव झा उपस्थित होते.
बैठकीत चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी कोल्हापूर रेल्वे वाहतुकीबाबतच्या विविध अडचणी मांडल्या. त्यानंतर काही उद्योजकांनी मालवाहतूक करताना भेडसाविणाऱ्या समस्या सांगितल्या शिवाय काही सूचना केल्या. त्यावर एस. के. तिवारी यांनी कोल्हापूर रेल्वे मालवाहतूक संबंधित असणाऱ्या अडचणी त्वरित सोडविण्यात येतील. शिवाय आवश्यक त्या सुधारणा करून सेवा भक्कम केली जाईल, तसेच यासंबंधी असणाऱ्या सूचनांचे प्रस्ताव सादर करण्याचे संघटनांना आवाहन केले. बैठकीस जयेश ओसवाल, धनंजय दुग्गे, प्रदीपभाई कापडिया, शिवनाथ बियाणी, बाहुबली पाटील, प्रकाश केसरकर, हेमंत डिसले, राजूभाई दोशी, अतुल शहा, राजू अलूकरकर, वैभव सावर्डेकर, प्रकाश भोसले, मानसिंग खुराटे, सेमल जैन, मोहन शेटे, प्रदीप व्हरांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
लवकरच प्रस्ताव तयार करणार
रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत कोल्हापुरातील रेल्वे मालवाहतुकीच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. स्थानिक व्यापारी, व्यावसायिकांना भेडसाविणाऱ्या समस्या तसेच गरजांबाबतचा प्रस्ताव तयार करण्याबाबत
१५ दिवसांत विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार आहे. त्यातून प्रस्ताव तयार करून तो रेल्वेला सादर केला जाईल, अशी माहिती कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी दिली.