रेल्वे प्रवासी भाडे दरवाढ झाली कमी, प्रवाशी संघटनेच्या आंदोलनाला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 07:12 PM2024-02-22T19:12:59+5:302024-02-22T19:13:41+5:30
रूकडी/माणगाव : रूकडी येथील रेल्वे प्रवाशी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाची दखल रेल्वे विभागाने घेत कोल्हापूर ते मिरज मार्ग ...
रूकडी/माणगाव : रूकडी येथील रेल्वे प्रवाशी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाची दखल रेल्वे विभागाने घेत कोल्हापूर ते मिरज मार्ग मार्गावरील विविध थांब्याचे तिकीट दर कमी केले. रेल्वे प्रवासी भाडे दर कमी करावे व भुयारमार्गातील अडथळे दूर करावे याकरिता गेली ३ वर्ष येथील रेल्वे प्रवासी संघटना विविध मार्गांने अहिंसात्मक आंदोलन करत आहे. अखेर आंदोलनाचे दखल घेत रेल्वे विभागाने प्रवासी भाडे आज, गुरुवार (दि.२२)पासून कमी आकारण्यास सुरूवात केले आहे.
रूकडी व परिसरातून दररोज हजारो प्रवासी रूकडी रेल्वेस्थानकावरून कोल्हापूर ते मिरज, सांगली येथे प्रवास करतात. यामध्ये गांधीनगर येथे बहुतांश नोकरवर्ग व कामगार यांचा समावेश आहे. रेल्वे विभागकडून सुरूवातीस कोल्हापूर ते मिरज मार्गाकरिता १०रू तसेच याचमार्गातील कोणत्याही थांब्याकरिता १०रूपये प्रवाशी तिकीट दर आकारत होते. दरम्यान, कोरोना काळानंतर तिप्पट दर आकारत ३० रू प्रवासी भाडे केले होते. त्याशिवाय स्थानकांच्या प्रवासासाठी ३०रू दर आकारत होते.
ही तिकीट दर कमी करून पूर्वी इतका करावा व रुकडी भूयारी मार्गातील अडचणी दूर कराव्यात याकरिता रूकडी येथील विधीज्ञ अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली रेल्वे प्रवासी संघटना गेली ३वर्ष विविध मार्गांने आंदोलन करत आहे. याचाच भाग म्हणून दि २६ आॅगस्ट २०२३ रोजी रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचे दखल केंद्रीय पातळीवर घेण्यात आली. अन् अखेर कोल्हापूर ते हातकणंगले करीता १०रू तर कोल्हापूर ते मिरज करिता १५ रू दर प्रवासी भाडे आकारणीस सुरूवात करण्यात आली आहे.
रेल्वे विभागाने प्रवासी भाडे कमी केले असून याचे श्रेय रेल्वे प्रवासी संघटनेचे आहे. कोल्हापुर ,सांगली करिता ज्यादा पैसेंजर गाडी सोडावेत, ऐतिहासिक रुकडी स्थानकाचा समावेश अमृत भारत योजनामध्ये करावे. जलद गाड्या रुकडी आणि गांधीनगर येथे थांबावेत. यासाठी तीव्र आंदोलन करणार. - माजी उपसरपंच अमितकुमार भोसले, विधीज्ञ