सुट्टीच्या हंगामात रेल्वे आरक्षण फुल्ल
By admin | Published: March 22, 2015 11:54 PM2015-03-22T23:54:49+5:302015-03-23T00:35:25+5:30
प्रवाशांची धडपड : तात्काळ रेल्वे तिकिटांच्या काळ्याबाजारात कोट्यवधीची उलाढाल--लोकमत विशेष
सदानंद औंधे - मिरज--उन्हाळी सुट्टीच्या हंगामात आरक्षित रेल्वे तिकिटांना मोठी मागणी असल्याने लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसची आरक्षित तिकिटे मेअखेरपर्यंत संपली आहेत. मे महिन्यात प्रवासासाठी आरक्षित रेल्वे तिकिटे मिळविणे प्रवाशांसाठी अवघड ठरले असल्याने तात्काळ तिकिटे प्रिमीयम दराने मिळविण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू आहे. तात्काळ तिकिटे मिळवून देणाऱ्या एजंटांची तिकीट खिडकीवर गर्दी वाढली आहे. उन्हाळी सुट्टीच्या हंगामातील रेल्वे तिकिटांचे आरक्षण मार्च महिन्यातच संपले आहे. तात्काळ तिकिटासाठीही प्रतीक्षा यादी मोठी असल्याने रेल्वे प्रवासी हैराण आहेत. सुट्टीच्या हंगामात लांबच्या प्रवासासाठी रेल्वे हाच स्वस्त व सोयीचा पर्याय असल्याने रेल्वे तिकीट खिडकीवर मोठी गर्दी आहे. मिरज रेल्वे स्थानकातून दररोज ६० पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वेगाड्या ये-जा करतात. सुट्टीच्या हंगामात एप्रिल व मे महिन्यात रेल्वे प्रवासासाठी मोठी गर्दी आहे. मिरजेतून सुटणाऱ्या पुणे-बेळगाव, कोल्हापूर-कुर्डूवाडी, पंढरपूर, परळी या पॅसेंजर गाड्यांमध्ये गर्दीमुळे पाय ठेवायला जागा नाही. गोवा, दिल्ली, अजमेर, गांधीधाम, बेंगलोर, नागपूर, मुंबई, तिरुपतीला जाणाऱ्या एक्स्प्रेसची मेअखेरपर्यंतची आरक्षित तिकिटे संपली आहेत. आरक्षित तिकिटांची प्रतीक्षा यादी दोनशेवर पोहोचल्याने तात्काळ आरक्षित तिकिटांना मोठी मागणी आहे. तात्काळ तिकिटांसाठी मागणीप्रमाणे प्रिमीयम दर लागू असल्याने दुप्पट व तिप्पट दराने तात्काळ तिकिटे घ्यावी लागत आहेत. महागडी तात्काळ तिकिटे मिळविण्यासाठीही तिकीट एजंट रात्रभर तिकीट खिडकीवर मुक्काम ठोकून आहेत. मात्र तात्काळ तिकिटांसाठीही ५० पेक्षा जादा प्रतीक्षायादी असल्याने प्रवाशांची निराशा होत आहे. दिल्ली, अजमेर, गांधीधाम, एर्नाकुलम, तिरूनेलवेल्ली, चंदीगड, बेंगलोर, अहमदाबाद या नियमित व साप्ताहिक एक्स्प्रेससाठी प्रतीक्षायादी मोठी आहे. मागणी वाढल्याने मे महिन्याच्या सुट्टीत रेल्वे तिकिटे दुर्मीळ ठरली आहेत.
प्रिमीयमचा
प्रवाशांना
फटका
मागणीप्रमाणे दर वाढणाऱ्या प्रिमीयम तात्काळ तिकिटांमुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असली तरी, प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
गर्दी असलेल्या रेल्वे गाड्यांच्या तात्काळ तिकिटांसाठी तब्बल पाचशे ते हजार रुपये जादा मोजावे लागत आहेत. वातानुकूलित दर्जाची तात्काळ तिकिटे मिळणे तर अशक्य झाले आहे. वातानुकूलित दर्जाच्या आरक्षित तिकिटासाठी हजारो रूपये जादा द्यावे लागत आहेत.
दोन महिने अगोदर मिळणारी आरक्षित तिकिटे पुढील महिन्यापासून चार महिने अगोदर मिळणार आहेत. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुढील ४ महिन्यांचे आरक्षण संपण्याची चिन्हे आहे.
एजंटांचा तिकीट खिडकीवर कब्जा
अनधिकृत तिकीट एजंट व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या साखळीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना तात्काळ आरक्षित तिकीट मिळणे दुरापास्त ठरले आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठी चार उपाययोजना फोल ठरल्या आहेत. रेल्वे स्थानकात आरक्षण खिडकीवर रात्रभर मुक्काम करुन तिकीट मिळविणारे एजंट सामान्य प्रवाशांची डाळ शिजू देत नाहीत. केवळ पंधरा मिनिटात संपणारी तात्काळ तिकिटे मिळविण्यासाठी एजंटांनी सर्वच लहान-मोठ्या स्थानकावरील तिकीट खिडक्यांवर कब्जा मिळविला आहे. रेल्वे आरक्षण केंद्रातील कर्मचारीही तिकीट एजंटांना सामील असल्याने रेल्वे तिकिटांच्या काळ्याबाजाराचा व्यवसाय तेजीत आहे.
मुंबई, पुण्याचे एजंट सांगलीत
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातच सुमारे पाचशे अनधिकृत तिकीट एजंट कार्यरत आहेत. रेल्वेच्या छोट्या स्थानकावर केवळ एक-दोनच कर्मचारी असल्याने अशा ठिकाणी तात्काळ आरक्षित तिकिटे मिळविणे एजंटांना सोयीचे ठरले आहे. कोल्हापूरपासून साताऱ्यापर्यंत छोट्या व मोठ्या रेल्वे स्थानकांवरील आरक्षण केंद्राच्या तिकीट खिडक्या एजंटांनी वाटून घेतल्या आहेत. कोणत्या दिवशी कोणाचा तिकीट खिडकीवर पहिला क्रमांक, हे सुध्दा ठरलेले आहे. रेल्वे आरक्षित तिकिटांना प्रचंड मागणी असल्याने मुंबई व पुण्यातील एजंट मिरज, सांगलीसह ग्रामीण भागातील छोट्या स्थानकापर्यंत आले आहेत. उन्हाळी सुट्टीच्या हंगामात आरक्षित तिकिटांच्या काळ्याबाजारात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरु असतानाही, या प्रकारास प्रतिबंध करणे रेल्वे प्रशासनाला शक्य झालेले नाही.