रेल्वे आरक्षणाचे नियम बदलले; आता ६० दिवस आधी रिझर्व्हेशन

By संदीप आडनाईक | Published: October 17, 2024 09:13 PM2024-10-17T21:13:51+5:302024-10-17T21:14:11+5:30

लांबपल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे आता केवळ दोन महिने आधीच फुल राहतील.

Railway reservation rules changed Reservation now 60 days in advance | रेल्वे आरक्षणाचे नियम बदलले; आता ६० दिवस आधी रिझर्व्हेशन

रेल्वे आरक्षणाचे नियम बदलले; आता ६० दिवस आधी रिझर्व्हेशन

संदीप आडनाईक/कोल्हापूर, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दिवाळीपूर्वी रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षणाच्या सध्याच्या नियमात बदल केला आहे. आता प्रवासाचा दिवस सोडून १२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी आरक्षण करता येणार आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना फायदा होणार आहे. लांबपल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे आता केवळ दोन महिने आधीच फुल राहतील.

मध्ये रेल्वेने यासंदर्भातील अधिसूचना १६ नोव्हेंबर रोजी जारी केली आहे. १ नोव्हेंबरपासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवी दिल्लीच्या प्रवासी मार्केटिंगचे संचालक संजय मनोचा यांनी जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार ३१ ऑक्टोबरपर्यंतचे आरक्षण कायम राहतील, त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी ३६५ दिवस आधी आरक्षण करण्याच्या नियमातही बदल झालेला नाही, अशी माहिती नमो रेल्वे पॅसेंजर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि मध्ये रेल्वेचे मुंबई सल्लागार समितीचे सदस्य अजय दुबे यांनी दिली.

या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना एक जानेवारीनंतरचे लांबपल्ल्याचे आरक्षण मिळणे दुरापास्त होणार आहे. पुढील दोन महिन्यांच्या बुकिंगसाठी प्रमुख आरक्षण केंदांबाहेर एजंटांनी बसवलेले भिकारी, गर्दुल्ले आणि बेकार तरुण यांच्या भल्यामोठ्या रांगा कमी होणार आहेत.

या निर्णयामुळे शुक्रवारी पुढील दोन महिन्यांचे आगाऊ आरक्षण सुरू होईल. यामुळे आरक्षण केंद्राबाहेरच्या परिसराचा ताबा घेणाऱ्या रेल्वे बुकिंग एजंटांचे मात्र नुकसान होणार आहे. सर्व आरक्षण केंद्राबाहेर लांब रांगा लागत, त्यात एकही अस्सल प्रवासी नसायचा. शुक्रवारी सकाळी खिडक्या उघडताच काही तासांतच पुढील १२० दिवसांचे रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे बुकिंग फुल होत होते.

यापूर्वीच्या पद्धतीमुळे वाढलेला तिकिटांचा काळाबाजार रोखण्यात येईल. शिवाय सामान्य प्रवाशांना पुढील दोन महिन्यांनंतरची तिकिटे मिळण्याची शक्यताही वाढलेली आहे.
-शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती.

या नियमामुळे अतिशय कमी कालावधीत प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सामान्य प्रवाशांना फायदा होणार आहे. रेल्वेला आरक्षणाचे पैसे वापरायला मिळणार नसले किंवा महसूल कमी मिळणार असला तरी सामान्य प्रवाशांचे पैसे अडकून राहणार नाहीत. यामुळे रेल्वेचा वाढलेला नफा दाखवून आगाऊ आरक्षण घेता येणार नाही.

-विनाेद ओसवाल, संचालक, 'नमो ट्रॅव्हल्स ॲन्ड टूर्स', भेंडे गल्ली.

असे बदलले रेल्वेचे आरक्षण कालावधी
-एप्रिल १९८१ ते जानेवारी १९८५ : ९०
-१ सप्टेंबर १९८८ ते ३० सप्टेंबर १९९३ : ४५
-१ सप्टेंबर १९९५ ते ३१ जानेवारी १९९८ : ६०
-१ मार्च २००७ ते १४ जुलै २००७ : ६०
-१ फेब्रुवारी २००८ ते ९ मार्च २०१२ : १२०
-१ मे २०१३ ते ३१ मार्च २०१५ : १२०

Web Title: Railway reservation rules changed Reservation now 60 days in advance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.