कोरोनानंतर रेल्वे सुरू, पण ज्येष्ठासह एकूण २२ प्रकारच्या सवलती अद्याप बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 01:42 PM2022-02-24T13:42:30+5:302022-02-24T13:42:55+5:30
प्रवासी संघटनांनी वारंवार मागणी करूनदेखील रेल्वे प्रशासनाकडे याकडे लक्ष दिलेले नाही.
कोल्हापूर : कोरोनाचा प्रकोप कमी होऊन निर्बंध शिथिल होत असताना थांबलेल्या रेल्वेही आता हळूहळू धावू लागल्या आहेत; पण रेल्वेकडून प्रवाशांना तिकिटातून मिळणाऱ्या सवलती मात्र अजूनही यार्डातच आहेत. ज्येष्ठासह एकूण २२ प्रकारच्या सवलती अद्याप बंदच असल्याने पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागत आहे. प्रवासी संघटनांनी वारंवार मागणी करूनदेखील रेल्वे प्रशासनाकडे याकडे लक्ष दिलेले नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०मध्ये पहिला लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून केंद्र सरकारने रेल्वे बंद केल्या. कोरोनाची दुसरी लाट संपल्यानंतर रेल्वे काही प्रमाणात सुरू झाल्या; पण तिसऱ्या लाटेत पुन्हा यावर निर्बंध आले. एकेका मार्गावरच्या निम्म्यापेक्षा जास्त रेल्वे बंदच ठेवण्यात आल्या; पण ज्या काही रेल्वे नियम पाळून चालू आहेत. तेथे मात्र कोरोना येण्यापूर्वी ज्या काही सवलती दिल्या जात होत्या, त्या मात्र पूर्ववत करण्यात आल्या नाहीत.
एवढी मिळते सवलत
रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात ३३ टक्के सवलत दिली जाते. त्याचा चांगला लाभ होता; पण आता ते दिलेच जात नसल्याने ज्येष्ठांना पूर्ण तिकिटाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
विशेष रेल्वेचा दर्जा असल्याने सवलत बंदच
कोरोनाची लाट ओसरल्यानंतर रेल्वे सुरू झाल्या आहेत. कोल्हापुरातून आजच्या घडीला कोल्हापूर ते सातारा ही एक पॅसेंजर व इतर सहा विशेष रेल्वे गाड्या धावत आहेत. कोल्हापुरातून सुटणाऱ्या तिरुपती, महालक्ष्मी, कोयना, धनबाद, गोंदिया, नागपूर, दिल्ली या रेल्वेमध्ये सवलत होत्या; पण या गाड्या आता धावू लागल्या तरी सवलत बंदच आहे.
ज्येष्ठांना फटकाआधीच आमचे वय झाले आहे, उत्पन्नाचे मार्ग कमी झाले आहेत, रेल्वेचा प्रवास इतर वाहनाच्या तुलनेत स्वस्त आणि सवलती मिळत असल्याने याला आम्ही प्राधान्य देतो; पण आता ही सवलत मिळणेच बंद असल्याने आम्हाला प्रवास करताना अधिकचा खर्च करावा लागत आहे. - सखाराम पाटील, जरगनगर
कोल्हापुरातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या पूर्ववत करण्याबाबत रेल्वे प्रशासनाची भूमिका ढिम्म असल्याने आधीच प्रवाशांमधून संताप आहे, आता ज्या काही सहा गाड्या सुरू आहेत, त्यात सवलत नाकारून रेल्वेने प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. आम्ही वारंवार पत्र पाठवून पाठपुरावा करत आहोत; पण दुर्लक्ष केले जात आहे. -शिवनाथ बियाणी, रेल्वे प्रवासी संघटना