‘रत्नागिरी गॅस’च्या विजेवर धावणार रेल्वे
By admin | Published: June 8, 2015 12:24 AM2015-06-08T00:24:37+5:302015-06-08T00:46:45+5:30
पीयूष गोयल : रेल्वेशी होणार करार; १५ जूनपासून वीजनिर्मिती सुरू
रत्नागिरी : सध्या बंद असलेल्या दाभोळ-अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस विद्युत निर्मिती प्रकल्पात १५ जून २०१५ पासून काही प्रमाणात वीजनिर्मिती सुरू होणार आहे. या विजेवर रेल्वे धावणार असून, वीज खरेदीबाबत कंपनी आणि रेल्वे यांच्यात लवकरच करार होणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गाव गोयल यांनी दत्तक घेतले आहे. गावच्या पाहणीसाठी तसेच तेथील कार्यक्रमासाठी ते रविवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
रत्नागिरी गॅस विद्युत प्रकल्प हा गॅसवर अवलंबून आहे. या प्रकल्पासाठी आता गॅस उपलब्ध झाला आहे. प्रथम काही प्रमाणात विजेचे उत्पादन सुरू होईल. त्यानंतर पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प सुरू होईल. या कंपनीशी संबंधित चार वित्तीय संस्था व महाराष्ट्र शासन यांच्यात चर्चा सुरू आहे. या प्रकल्पाची निर्मिती क्षमता वाढविण्याचाही प्रयत्न आहे. त्यातून ही कंपनी आर्थिकबाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याचा शासनाचा मानस आहे. या कंपनीतून निर्माण होणारी वीज ही ४.७० पैसे युनिट दराने रेल्वेला दिली जाणार आहे.
देशातील प्रत्येक शेतकऱ्याला वीज उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. देशाने गेल्या वर्षभरात विद्युत, कोळसा उत्पादनात प्रगती केली आहे. रत्नागिरी गॅस कंपनी सुरू होणार ही आणखी एक उपलब्धी आहे. गतवर्षी विद्युत उत्पादनात ८.४ टक्के, तर कोळसा उत्पादनात ८.२ टक्के वृद्धी झाली आहे. १ एप्रिल २०१५ पासून ५ जून २०१५ या ६७ दिवसांच्या काळात कोळसा उत्पादनात ११.९ टक्के वाढ झाली आहे. २०१९ पर्यंत देशाचे वीजनिर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)