रेल्वे, विमानसेवा सुरू; पण प्रवासी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:21 AM2021-04-19T04:21:52+5:302021-04-19T04:21:52+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमुळे कोल्हापुरातील रेल्वे, विमानसेवेची प्रवासी संख्या निम्म्यावर आली आहे. प्रवासी कमी झाल्याने विमानसेवेच्या काही मार्गावरील ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमुळे कोल्हापुरातील रेल्वे, विमानसेवेची प्रवासी संख्या निम्म्यावर आली आहे. प्रवासी कमी झाल्याने विमानसेवेच्या काही मार्गावरील फेऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर-नागपूर रेल्वे सेवा थांबविण्यात आली आहे.
यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी विमान आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आलेली नाही. कोरोना नियमांचे पालन करून या दोन्ही माध्यमातून नागरिकांना प्रवास करता येत आहे. कोल्हापुरातून सध्या चार रेल्वे धावत आहेत. त्यामध्ये कोल्हापूर-गोंदिया, कोल्हापूर-मुंबई धावणारी महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेस, कोल्हापूर-तिरुपती यांचा समावेश आहे. दर शुक्रवारी, सोमवारी असलेली कोल्हापूर-नागपूर रद्द झाली आहे. मुंबई, गोंदिया, आदी ठिकाणांहून कोल्हापुरात येणाऱ्या आणि परराज्यातील कामगार वगळता कोल्हापुरातून जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण कमी आहे. त्यांच्या संख्या ५० टक्क्यांवर आली आहे. कोल्हापुरातून सध्या कोल्हापूर-तिरुपती, हैदराबाद-कोल्हापूर या मार्गांवर रोज, तर कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-अहमदाबाद आणि कोल्हापूर-बंगलोर या मार्गांवर आठवड्यातील तीन दिवस विमानसेवा सुरू आहे. गेल्या वर्षातील मे महिन्यापासून यंदा संचारबंदी लागू होण्यापर्यंत एकूण ७५८०० जणांनी या मार्गांवरील विमानांतून प्रवास केला. संचारबंदी लागू झाल्यापासून विमान प्रवाशांची संख्या निम्म्यावर आली आहे.
प्रतिक्रिया
गेल्या आठवड्यात संचारबंदी लागू झाल्यापासून प्रवासी संख्या निम्म्यावर आली आहे. सध्या विमानसेवा सुरळीतपणे सुरू आहे. आणखी कमी झाल्यास काही मार्गांवरील विमान फेऱ्या कमी होऊ शकतात.
-कमलकुमार कटारिया, संचालक, कोल्हापूर विमानतळ.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सध्या कोल्हापूरहून चार रेल्वे सुरू आहेत. प्रवासी संख्या ५० टक्क्यांवर आली आहे. कोल्हापूर-धनबाद रेल्वेने जाण्यासाठी परराज्यांतील मजूर, कामगारांची गर्दी होत आहे.
-ए. आय. फर्नांडीस, प्रमुख, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस.
चौकट
ट्रॅव्हल एजंटांना परवानगी द्यावी
रेल्वे, विमानसेवा सुरू आहे. मात्र, त्यासाठी तिकीट आरक्षण, नोंदणी करणे आवश्यक असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमुळे ट्रॅव्हल एजंटांना त्यांची कार्यालये बंद ठेवावी लागत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी कोरोना नियम आणि काही दोन ते चार तास कार्यालय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे सदस्य बी. व्ही. वराडे यांनी केली.