रेल्वेत दहा हजार कोटी गुंतविणार

By Admin | Published: June 28, 2015 12:34 AM2015-06-28T00:34:49+5:302015-06-28T00:36:14+5:30

मुख्यमंत्र्यांची घोषणा : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन

Railways will invest Rs 10,000 crore | रेल्वेत दहा हजार कोटी गुंतविणार

रेल्वेत दहा हजार कोटी गुंतविणार

googlenewsNext

सावंतवाडी : रेल्वे ही केंद्र सरकारची असल्याचे म्हणत मागील सरकारने रेल्वेमुळे होणाऱ्या विकासाकडे दुर्लक्ष केले; पण युती शासन राज्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून रेल्वेत पाच वर्षांत दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. आतापर्यंत राज्यातील चार रेल्वे मार्गांना मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच मागील सरकारच्या घोषणा प्रत्यक्षात उतरविण्याचे काम आम्ही करीत असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना हाणला.
मुख्यमंत्री फडणवीस सावंतवाडी टर्मिनसच्या भूमिपूजनासाठी मळगाव येथे आले होते. यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी करीत अनेक विकासाच्या मुद्द्यांना हात घातला. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार विजय सावंत, वैभव नाईक, रमेश चव्हाण, नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी आमदार राजन तेली, शिवराम दळवी, प्रमोद जठार, शंकर कांबळी, जयानंद मठकर, पुष्पसेन सावंत, कोकण आयुक्त राधेशाम मोपेलवार, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, ई. रवींद्रन, पोलीस महानिरीक्षक प्रवीण लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश सिंग, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, नगराध्यक्ष बबन साळगावकर, रेल्वेचे सरव्यवस्थापक संजय गुप्ता, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, काका कुडाळकर, राजन म्हापसेकर, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सावंतवाडी टर्मिनसचे स्वप्न हे फक्त रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे साकार झाले. मागील पंधरा वर्षांत फक्त घोषणाबाजीच झाली. प्रत्यक्षात काम झालेच नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात चार नवीन रेल्वे मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. बंदर विकासाने रेल्वेला समृद्धी येऊ शकते. त्यासाठीच सरकार रेल्वेत दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यापूर्वीचे सरकार रेल्वे हा केंद्राचा प्रकल्प असल्याचे म्हणत असल्याने वर्षानुवर्षे प्रकल्प तसेच पडून होते; पण आता तसे होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
कोकणचा विकास झाला पाहिजे, यासाठी आम्ही कालबद्ध कार्यक्रम हाती घेत असून, जळगाव येथे जैन ठिबक सिंचनच्यावतीने आंब्यावर प्रकिया प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तो प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये कृषी विद्यापीठ व जैन सिंचनच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. तसेच चिपी विमानतळाबाबत गैरसमज पसरविण्यात येत आहे; पण काही केले तरी चिपी विमानतळ हे गोव्याच्या तोडीचे करण्यात येणार आहे. अनेक विमाने येथे उतरणार असून, तशी व्यवस्था राज्य सरकार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या दोन वर्षांत चिपी विमानतळ पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बचतगटासाठी प्रत्येक जिल्ह्यात मॉल उभारण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक तालुक्याचा बचतगटाचा माल ठेवून त्याची विक्री करण्यात येणार आहे. १८ वर्षांपूर्वी युती शासनाने पर्यटन जिल्ह्याची घोषणा केली आणि युतीशासनच कृतीतून प्रकल्प मार्गी लावत आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता, आदींनी विचार मांडले. माजी आमदार जयानंद मठकर यांच्या हस्ते रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
कोल्हापूर-सिंधुदुर्ग रेल्वेमार्गाच्या कामाचा लवकरच प्रारंभ : प्रभू
पूर्वी सर्वजण ‘पश्चिम महाराष्ट्राचा विकास आणि कोकण भकास’ असे म्हणत असत; पण आता आम्ही रेल्वेच्या माध्यमातून कोकणला विकासाच्या प्रदेशाकडे जोडत आहोत. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण आता पूर्ण होत आले असून, लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मी आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देत असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केले. कोकण रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण करण्याची घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी केली. खासगी गुंतवणुकीतून रेल्वे मळगाव येथे हॉटेल उभारणार असल्याचेही यावेळी रेल्वमंत्र्यांनी जाहीर केले.
तुम्ही काय केले?
जिल्ह्यात अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत. सी-वर्ल्ड प्रकल्प होणार असून, हा प्रकल्प अनेकांना रोजगार देणारा आहे. तो होणारच. कोणी कितीही अफवा पसरविल्या तरी त्याचा फायदा होणार नाही. पंधरा वर्षांत काहीच केले नाही. त्यामुळे आम्हाला हे करावे लागत आहे, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी मंत्री राणे यांना लगावला.
भूमिपुत्रांना मदतीत महाराष्ट्र ‘मॉडेल’
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रकल्प होत आहेत. यासाठी भूमिपुत्रांच्या जमिनी लागणार असून, त्यांना जास्तीत जास्त मोबदला दिला जाणार आहे. भूमिहिनांना मदत करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य असेल. विशेष पॅकेज बघून भूमिपुत्रच सरकारकडे जमिनी द्यायला येतील, असे काम करून दाखवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Web Title: Railways will invest Rs 10,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.