कोल्हापुरात पुन्हा पावसाच्या सरी बरसल्या; पुढील चार दिवस पाऊस, बळीराजा सुखावला
By भीमगोंड देसाई | Published: August 16, 2023 07:30 PM2023-08-16T19:30:30+5:302023-08-16T19:32:05+5:30
माळरानावरील ज्वारी, भुईमूग, सोयाबीन अशी पिके वाळत होती
कोल्हापूर : शहर, परिसर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी बुधवारी दुपारनंतर पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. आठ दिवसांहून अधिक काळ गायब झालेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. हवेत गारवा निर्माण झाला. शहरातील सखल भागातील रस्त्यावर पाणी तुंबून राहिले.
तब्बल आठवड्याहून अधिक दिवस पावसाने पाठ फिरवली होती. यामुळे नदी, ओढ्यातील पाणी कमी झाले. माळरानावरील ज्वारी, भुईमूग, सोयाबीन अशी पिके वाळत होती. पाऊस नसल्याने सर्वच पिकांची वाढ खुंटली होती. गडहिंग्लज, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यात इतर ठिकाणी दुपारच्यावेळी उन्हाळ्यासारखे ऊन पडत होते. हवेत कमालीची उष्णता वाढली होती. अंगाची लाहीलाही होत होती. यामुळे शेतकऱ्यांसह साऱ्यांनाच पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती.
आकाशात ढग जमत होते. पण पाऊस कोसळत नव्हता. बुधवारी पहाटेपासून आकाशात ढगांची गर्दी राहिली. सकाळी साडेदहाच्या सुमारास कागल, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड तालुक्यातील काही भागात हलका पाऊस झाला. शहरात आणि परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने पादचारी, दुचाकी, फेरीवाले, विक्रेत्यांची तारांबळ उडाली. अर्धा तास जोरदार पाऊस पडला. त्यानंतर काही प्रमाणात पाऊस कमी झाला. मात्र अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या.
२२ पर्यंत पाऊस
२० ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस होईल. त्यानंतर २१ आणि २२ ऑगस्टपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.