पाऊसही असा भेदभाव करताेय...
By वसंत भोसले | Published: August 6, 2023 09:59 AM2023-08-06T09:59:53+5:302023-08-06T10:00:22+5:30
पावसाला झालंय तरी काय? असा धीरगंभीर वाटणारा प्रश्न विचारावासा वाटतो आहे.
- डॉ. वसंत भोसले, संपादक, कोल्हापूर
रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पूर चढे
पाणीच पाणी चहूकडे गं बाई
गेला मोहन कुणीकडे...
शा सुंदर ओळी लिहून पी. सावळाराम यांनी केलेले वर्णन आठवते. पावसाळ्याच्या दिवसांत या गीताची धून हमखास आकाशवाणीवरून ऐकायला मिळत होती आणि तसाच पाऊस चहूकडे पाणी पाणी करीत पडत होता. त्या पावसाला झालंय तरी काय? असा धीरगंभीर वाटणारा प्रश्न विचारावासा वाटतो आहे. ‘लोकमत’मध्ये साताऱ्याची एक बातमी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी चालू पावसाळी हंगामातील चार हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अद्याप अर्धा पावसाळा संपायचा आहे. अजून अडीच-तीन हजार मिलिमीटर पाऊस पडेल. त्याच सातारा जिल्ह्यातील माणदेशातील ऐंशी गावांत पावसाचा नुसताच शिडकावा आहे. रिमझिमदेखील नाही, सारखा तर बिलकुल नाही.
आपल्या पाऊसमानाचे ऋतूचक्रच काहीतरी बिघडले आहे. ते आता समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. केवळ मोहनचा शोध घेऊन चालणार नाही. कारण जिथे पडतो तेथे यमुनेला प्रचंड महापूर येतो आहे. पाणीच पाणी चहूकडे होताना दिसते आहे. ऋतुमानानुसार महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यांत पाऊस होत असतो. तो सर्वत्र सारखाच पडणार नाही, तशी अपेक्षाही नसते. मात्र, मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार कोसळतो आहे. विशेषत: सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर बेफाम होऊन कोसळतो आहे. त्याच्या पुढील पठारी भागात पन्नास किलोमीटरवर पाऊस नाही. साताऱ्याच्या माणदेशी तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याच जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पर्वतीय भागात चार हजार मिलिमीटरहून अधिक पाऊस पडतो आहे.
तीन-चार गावे नवी चेरापुंजी
nचेरापुंजीला सर्वाधिक पाऊस पडतो असे आपण म्हणत आलो आहोत. मात्र अलीकडच्या चार-पाच वर्षांत महाराष्ट्रातील तीन-चार गावे नवी चेरापुंजी बनली आहे.
n२०१९ च्या पावसाळ्यात सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजला अकरा हजार मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली होती.
nअशी आता तीन-चार ठिकाणे आहेत. जैवविविधतेवर सारा भार आहे. त्याची साखळी अशी तुटत जाऊ लागली तर जगणे मुश्कील होईल.
हिमाचलमध्ये गावेच्या गावे गेली वाहून
उत्तर भारतात विशेषत: हिमालयीन पर्वतरांगांमध्ये मोसमी पाऊस पोहोचण्यास ऑगस्ट उजाडतो. मात्र, गेल्या महिन्यात हिमाचल प्रदेशात तुफान पाऊस झाला. गावेच्या गावे वाहून गेली. मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या.
यमुना नदीला दोन वेळा महापूर आला. दिल्ली महानगरातील अनेक भागांत पुराचे पाणी शिरले. प्रचंड वाताहात झाली. ज्या भागात पडतो तेथे प्रचंडच पडतो आहे. मागील एप्रिल महिन्यात विदर्भात सलग एकवीस दिवस पाऊस पडत होता. याउलट पश्चिम महाराष्ट्रात एकही उन्हाळी वळीव पाऊस झाला नाही.
गहू तामिळनाडूत पिकत नाही आणि भात राजस्थानात उगवत नाही. त्या त्या भागांत हवामानानुसार पीक पद्धती ठरत गेली आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार राहणीमानातील चढ-उतार निश्चित झालेले आहेत.
उत्तर कर्नाटक ते ओडिशापर्यंतच्या प्रदेशात पाणी नव्हते तेव्हा गरीब जनता पोट भरण्यासाठी स्थलांतरित होत होती. आता पाण्याची सोय होताच त्यांचे स्थलांतर थांबले आहे. याला नियोजनबद्ध पद्धतीने बांधलेली धरणे वरदान ठरली आहेत.
हवामानातील बदल कशामुळे झाले?
चालू हंगामातील हवामानातील बदल कशामुळे झाले याचे कारण युरोपमधील प्रचंड उन्हाळा मानला जातो. तो कशामुळे याचे उत्तर अद्याप नाही. पण, त्या उन्हाळ्यामुळे अरबी समुद्रात बाष्पीभवन प्रचंड झाले, त्याचा परिणाम होऊन चक्रीवादळ निर्माण झाले.
त्या वादळाने नैऋत्य मान्सून वारे विस्कटून टाकले. परिणामी मोसमी वाऱ्याबरोबर भारतीय उपखंडावर बरसणारा मोसमी पाऊस उधळला गेला. तो राजस्थानमध्ये कोसळत हिमाचल प्रदेशावर आदळला.
परिणामी संपूर्ण ऋतुमान आणि त्याचे चक्र उद्ध्वस्त करून गेला. महाराष्ट्राच्या ‘नेमेचि येतो मग पावसाळा’प्रमाणे कोकण वगळता कोणत्याही विभागात पुरेसा पाऊस झालेला नाही. केवळ कोकण आणि सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पाऊस झाल्याने धरणे भरत आली.
पंचगंगा नदी वगळता एकाही नदीला महापूर आला नाही किंबहुना कमी पाऊस पडणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण मात्र भरत आहे.