जिल्ह्णात पावसाचा शिडकावा दिवसभर ढगाळ वातावरण
By admin | Published: March 1, 2015 12:43 AM2015-03-01T00:43:16+5:302015-03-01T00:43:40+5:30
पावसामुळे वेलवर्गीय पिकांना फटका बसणार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णात शनिवारी दुपारी दीड वाजता पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासून जिल्ह्णात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरण व पावसामुळे वेलवर्गीय पिकांना फटका बसणार आहे. यंदा फेबु्रवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा सुरू झाला होता. गेले पंधरा दिवस तर उन्हाचा कडाका कमालीचा वाढला होता. फेबु्रवारी महिन्यातच एप्रिल-मे मधील उष्मा जाणवत होता. सकाळी नऊ वाजल्यापासूनच अंगाची लाहीलाही सुरू होती. शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्णात ढगाळ वातावरण होते. दुपारी दीड वाजता हलक्या सरी कोसळल्या. साधारणत: तासभर हलका शिडकावा सुरू राहिला. त्यानंतर ढगाळ वातावरण कायम राहिले. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसानंतर हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. ढगाळ हवामान व पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. वेलवर्गीय पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जिल्ह्णातील बहुतांशी गुऱ्हाळघरे बंद झाली असली तरी सुरू असणाऱ्या गुऱ्हाळघरमालकांची अचानक आलेल्या पावसाने त्रेधातिरपीट उडाली. वीट व्यावसायिकांचे पावसामुळे धाबे दणाणले.
सूर्यफूल, गहू पिकांना किडीचा प्रादुर्भाव शक्य
कोपार्डे : शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस यामुळे पावसाळी वातावरण सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वांत मोठा फटका रब्बीतील सूर्यफूल, गहू या पिकांना बसणार आहे, तर आणखी जादा पाऊस पडल्यास साखर कारखान्यांच्या हंगामाला अडचणी निर्माण होणार आहेत.
उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्याचा संयोग होऊन हे वातावरण निर्माण झाल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. या पावसामुळे सूर्यफुलावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, तर गहू पिकावर काळपट पडण्याबरोबर तांबेरा रोगाचाही प्रादुर्भाव होतो.
सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली असल्याने हंगाम अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.