कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, दिवसभर उघडझाप : नद्यांच्या पातळीत मात्र वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:45 PM2018-06-27T18:45:43+5:302018-06-27T18:47:47+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर उघडझाप राहिली असून, अधूनमधून जोरदार कोसळणाऱ्या सरी मात्र पाणीच पाणी करीत होत्या. गगनबावडा, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यांत मात्र पावसाची रिपरिप कायम राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झालेली दिसते.
कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर उघडझाप राहिली असून, अधूनमधून जोरदार कोसळणाऱ्या सरी मात्र पाणीच पाणी करीत होत्या. गगनबावडा, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यांत मात्र पावसाची रिपरिप कायम राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झालेली दिसते.
गेले दोन दिवस पावसाने जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले होते. मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर राहिल्याने आणखी दोन-तीन दिवस असाच पाऊस राहिला तर नद्यांना पूर येण्याची शक्यता होती; पण बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला.
सकाळी सूर्यनारायणाने दर्शन दिल्याने पाऊस एकदमच थांबला. दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरूच राहिला. अधूनमधून सरी कोसळल्या, तरी सगळीकडे पाणीच पाणी झाले.
धरणक्षेत्रात मात्र चांगला पाऊस सुरू असून, तुळशी धरणाचा अपवाद वगळता बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सर्वच धरणांच्या कार्यक्षेत्रांत अतिवृष्टी झाली. सर्वाधिक २०० मिलिमीटर पाऊस कासारी धरणक्षेत्रात झाला.
गगनबावडा तालुक्यातही सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली असून चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांत पावसाची रिपरिप कायम राहिली. कोल्हापूर शहरात दिवसभर उघडझाप राहिली. जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगेची पातळी २३ फुटांपेक्षा अधिक झाली आहे.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा-
हातकणंगले (२.९४), शिरोळ (१.४२), पन्हाळा (१२.४२), शाहूवाडी (३२.००), राधानगरी (३७.८३), गगनबावडा ( ९३.५०), करवीर (१०.१८), कागल (२०.४२), गडहिंग्लज (१४.००), भुदरगड (५४.००), आजरा (३३.७५), चंदगड (६४.१६).