सातारा जिल्ह्यात सर्वदूर कोसळला पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:23 AM2021-05-18T04:23:40+5:302021-05-18T04:23:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सातारा जिल्ह्यातही झाला असून, रविवारपासून सर्व ११ तालुक्यांत कमी-अधिक फरकाने पावसाने ...

Rain falls everywhere in Satara district! | सातारा जिल्ह्यात सर्वदूर कोसळला पाऊस !

सातारा जिल्ह्यात सर्वदूर कोसळला पाऊस !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सातारा जिल्ह्यातही झाला असून, रविवारपासून सर्व ११ तालुक्यांत कमी-अधिक फरकाने पावसाने हजेरी लावली, तर सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात रविवारी रात्रभर पाऊस होता. त्यातच पावसाबरोबरच जोरदार वारा असल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडल्याने नुकसान झाले. दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत महाबळेश्वर मंडलात ८३, तर लामज येथे सर्वाधिक १२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून वळवाचा पाऊस होत आहे. त्यातच तौक्ते वादळाचा प्रभाव दोन दिवसांपासून जिल्ह्यात दिसू लागला आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासून साताऱ्यासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तसेच वारे वाहत होते, तर सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला हळूहळू पाऊस पडत होता; पण रात्री आठनंतर वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. विशेषकरून सातारा शहरासह पश्चिम भागात हा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. सातारा तालुका, पाटण, जावळी, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यांत पावसाचा जोर राहिला, तर कोरेगाव, माण, खटाव, फलटण, कऱ्हाड या तालुक्यांत अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. रात्रभर हा पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडत होता. सातारा शहरात तर रविवारी रात्रभर रिमझिम पाऊस आणि वारा वाहत होता. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडून वीजतारांचे नुकसान झाले. तसेच घरांवरही झाडांच्या फांद्या कोसळण्याचा प्रकार घडला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.

दरम्यान, सोमवारीही पाऊस पडत होता. पूर्व भागात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते; पण पश्चिम भागात अधून-मधून पाऊस पडत होता. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. त्यातच वारेही वाहत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत होता.

--------------------------------------------

कोल्हापुरात वाऱ्यासह पावसाची उसंत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने काहीसी उसंत घेतली. रविवारी दिवस-रात्र जोरदार पाऊस कोसळल्याने काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस पिकाला मात्र हा पाऊस पोषक ठरला आहे.

तौक्ते वादळाचा कोल्हापूर जिल्ह्यालाही फटका बसला. रविवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. वाऱ्यांमुळे डेरेदार वृक्ष भुईसपाट झाले आहेत. रस्त्यावर तुटून पडलेल्या झाडांच्या फांद्याचा अक्षरश: खच पडला होता. लॉकडाऊन असल्याने वाहतूक कमी असली तरी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना कसरत करीतच मार्ग काढावा लागला. रविवारी रात्रभर पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. सोमवारी सकाळीही अकरापर्यंत ग्रामीण भागात पाऊस राहिला. तौक्ते वादळ मुंबईहून गुजरातच्या दिशेने सरकत राहिले, तसे वारे व पावसाची तीव्रता कमी झाली होती. काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळत राहिल्या. कोल्हापूर शहरात मात्र वारे थांबले होते. आकाश काहीसे स्वच्छ झाले आणि दुपारनंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले.

--------------------------------------------

सांगली जिल्ह्यात सोमवारी आकाश स्वच्छ होते आणि दिवसभर सूर्यनारायणाने दर्शन दिले.

Web Title: Rain falls everywhere in Satara district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.