गावागावांत पर्जन्यमापके बसवणार - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:51 IST2025-02-22T12:50:25+5:302025-02-22T12:51:08+5:30

भीमा कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन

Rain gauges will be installed in the villages so that possible damage can be avoided if the weather is predicted says Agriculture Minister Manikrao Kokate | गावागावांत पर्जन्यमापके बसवणार - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे 

गावागावांत पर्जन्यमापके बसवणार - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे 

कोल्हापूर : लहरी हवामानामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांना गावातच हवामानाचा अंदाज आला तर संभाव्य नुकसान टाळता येऊ शकेल, यासाठी गावागावांत पर्जन्यमापक बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची घोषणा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी येथे केली. भीमा कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातील सर्वांत मोठे असून, येथे एकाच छताखाली शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान अवगत होणार असून अशा प्रकारच्या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून मेरी वेदर मैदानावर आयोजित ‘भीमा कृषी प्रदर्शन-२०२५’च्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. माजी आमदार महादेवराव महाडिक अध्यक्षस्थानी होते.

मंत्री कोकाटे म्हणाले, शेतीपासून तरुणवर्ग बाजूला जात असून शेती किफायतशीर करण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूदही केली आहे.
खासदार महाडिक म्हणाले, गेल्या १७ वर्षांपासून भीमा कृषी प्रदर्शन म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरत आहे. एकाच छताखाली शेतकऱ्यांपर्यंत नवतंत्रज्ञान पोहचविण्याचा प्रयत्न आहे. खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, भरमूण्णा पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित आदी उपस्थित होते. भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी आभार मानले.

जीएसटीतून वगळा..

शेतीशी निगडित सर्व बाबींना जीएसटीतून वगळण्याची गरज आहे. कारण त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची किंमत वाढते आणि त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसतो. शेतीशी संबंधित काही कायद्यात दुरुस्त्या करण्याचीही गरज आहे, तरच शेतीला स्थिरता येईल, असे कृषिमंत्री कोकाटे यांनी सांगितले.

‘मनरेगा’मधून शेतमजुरी

एकीकडे शेतमजूर मिळेनात आणि दुसऱ्या बाजूला मिळाले तर त्यांची मजुरी परवडत नसल्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. यासाठी ‘मनरेगा’मधून मजुरी देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरु असल्याचे मंत्री कोकाटे यांनी सांगितले.

प्रदर्शनाचा निम्मा खर्च कृषी विभागाने करावा

कृषी प्रदर्शने ही कृषी विभागाचे काम करत असून, अशा प्रदर्शनांना येणाऱ्या खर्चापैकी निम्मा खर्च कृषी विभागाने करावा, असे मंत्री कोकाटे यांनी सांगितले.

उमेश पाटील यांचा विशेष सत्कार

कृषी विभागात आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारे विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील यांचा विशेेष सत्कार मंत्री कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागातील डॉ. दीपाली भूतकर, डॉ. अशोक गावडे, डॉ. हणमंत गुरव, डॉ. आनंद पाटील, डॉ. निवृत्ती पाटील, डॉ. पल्लवी खाेत, डॉ. दिलीप बारड, संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Rain gauges will be installed in the villages so that possible damage can be avoided if the weather is predicted says Agriculture Minister Manikrao Kokate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.