गुढीपाडव्याला शहरात ‘पाऊस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:54 AM2018-03-19T00:54:35+5:302018-03-19T00:54:35+5:30
कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सोने, चांदी, दुचाकी, चारचाकी, टीव्ही, फ्रिज, सायकल, आदींची खरेदी तडाखेबंद, तर गृहप्रकल्पांची खरेदी-विक्रीही जोरदार झाली. त्यामुळे दिवसभरात सुमारे शंभर कोटींहून अधिक रुपयांच्या उलाढालीने बाजाराला झळाळी आली.
गुढीपाडवा म्हणजे समृद्धी; मग खरेदीही या मुहूर्तावरच अधिक होेते. त्यामुळे ग्राहकांनी सोन्या-चांदीसह दुचाकी, कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सायकल, शिलाई मशीन खरेदीसाठी दिवसभर गर्दी केली होती. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर नवीन वस्तू घरी नेण्याची लगबग दिसत होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक्स्चेंज आॅफरसह शून्य टक्केव्याजदराने कर्जपुरवठा, एक्स्चेंज स्कीम, हमखास भेटवस्तू, आदी योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बाजारपेठेत उत्साह संचारला होता. यासह काही गृहप्रकल्पांचेही आरक्षण व गृहप्रवेश याच मुहूर्तावर झाले.
मुहूर्ताची खरेदी म्हणून सोनेखरेदीला आजही प्राधान्य दिले जाते. लग्नसराई काही दिवसांवर आल्याने मंगळसूत्र, कानांतील दागिने, डिझायनर नेकलेस या अलंकारांना सर्वाधिक मागणी होती. त्याशिवाय गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून अनेक ग्राहकांनी चोख सोने, सोन्याचे नाणे, लक्ष्मीचे नाणे, वळे खरेदीवर भर दिला. ब्रँडेड ज्वेलर्समध्ये तर सायंकाळी पाय ठेवायलाही जागा नव्हती. यासह गुजरी, भाऊसिंगजी रोडचा परिसर ग्राहकांनी फुलून गेला होता.
सायकल, दुचाकीसह चारचाकी वेगात
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुचाकींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दिवसभर चारचाकी वाहनांच्या शोरूममध्येही ग्राहकांची मोठी वर्दळ होती. अनेकजण पाडव्याच्या मुहूर्तावर सायकली खरेदी करताना लक्ष्मीपुरी परिसरातील दुकांनामध्ये दिसत होते.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना सर्वाधिक मागणी
खरेदी उत्सवात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना यंदाही सर्वाधिक मागणी होती. उन्हाळ्यात गारवा देणारे कूलर, एसी, फ्रिजसह वॉशिंग मशीन, एलईडी, मायक्र ोवेव्ह ओव्हन, आदी मनपसंत वस्तूंच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी शोरूम्सचे दालन भरून गेले होते. या दिवसानिमित्त विक्रेत्यांनी ग्राहकांना सुलभ अर्थपुरवठा, एक्स्चेंज स्कीम, हमखास भेटवस्तू दिल्या.
‘फोर जी’चा धमाका
मोबाईल कंपन्यांमध्ये फोर-जीच्या आॅफर देण्यासाठी स्पर्धा लागली आहे. तीन हजार ते चाळीस हजारांपर्यंत किमती असलेले मोबाईल बाजारपेठेत होते; तर ५ ते १५ हजार रुपयांच्या मोबाईलला अधिक मागणी होती. दिवसभर मोबाईल विक्रेत्यांच्या दुकानांतही खरेदीसाठी तुडुंब गर्दी होती.
नागरी बँकांत मुहूर्तावर ठेवी
सोन्या-चांदीच्या खरेदीबरोबर नागरी बँकांच्या ठेवींमध्ये अनेकांनी गुंतवणूक केली. यात कोट्यवधींच्या ठेवी या मुहूर्तावर जमा झाल्या. शहरातील काही नागरी बँका दुपारपर्यंत सुरू होत्या. जोडीला ‘गोल्ड बाँड’लाही मोठी मागणी होती.
गेल्या दोन वर्षांपासून मंदीचे सावट असलेल्या गृहप्रकल्पावरील मंदीचे सावट काही प्रमाणात दूर झाल्याचे चित्र रविवारी दिसून आले. अनेक नागरिकांनी आरक्षित केलेल्या घरकुलांत मुहूर्तावर गृहप्रवेश केला.
शोभायात्रा, गुढ्या, झेंडे उभारून स्वागत
घरासमोर पारंपरिक पद्धतीने उभारलेल्या गुढ्या, अंबाबाई दर्शनासाठी झालेली गर्दी आणि जल्लोषी शोभायात्रा अशा वातावरणात मराठी नववर्षाचा पहिला दिवस, अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी गुढ्यांवर भगवे झेंडे उभारण्यात आले होते. अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
सकाळी नऊपर्यंत सर्वत्र गुढ्या उभारल्या गेल्या होत्या. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ या जुन्या कोल्हापूरमध्ये गुढ्या उभारतानाची लगबग जाणवत होती. सकाळी साडेनऊ वाजता करवीर गर्जना ढोलपथकाच्या वतीने स्वागतयात्रा निघाली. ढोलताशांच्या निनादात यावेळी ही मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि ढोल वाजविणाऱ्या गणपतीची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर स्वाती यवलुजे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. ५१ मुलींच्या ध्वजपथकाने उपस्थितांची मने जिंकली. नरेंद्र महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीनेही सायंकाळी शोभायात्रा काढली. (पान ६ वर)