पावसाने पळविला तोंडचा घास
By admin | Published: October 28, 2014 12:04 AM2014-10-28T00:04:55+5:302014-10-28T00:19:26+5:30
जिल्ह्यात पंचनामे सुरू : पंचनाम्यासाठी आठवडा लागणार
रत्नागिरी : जिल्ह्यात गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीची मोठी हानी केली आहे. कापणीयोग्य झालेली शेती पावसात भिजली असून, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
जिल्ह्यात पावसाने गेल्या चार दिवसांत कहर केला असून, वादळी वाऱ्यांसह जिल्ह्याच्या विविध भागांत सायंकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे. सध्या भातकापणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे भात कापून ते त्याचठिकाणी वाळत ठेवले जाते. या भाताचेही मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतजमिनीत पाणी साचले असून, त्यावर भात तरंगू लागले आहे.
या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी कृषी विभागाला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात पंचनाम्याच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. तलाठी, ग्रामसेवकांबरोबरच कृषी साहाय्यकांचीही मदत घेतली जाणार आहे.
याबाबत जिल्हा कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी सांगितले की, जिल्ह्यात भातशेतीचे तीन प्रकारचे नुकसान झाले आहे. कापून शेतात ठेवलेल्या भाताचे, तसेच गरव्या प्रकारच्या भाताचे नुकसान झाले आहे. गरव्या भाताचा दाणा काळा पडण्याची भीती आहे, तसेच शेतात उभे असलेले पीकही या पावसामुळे नुकसानीत गेले आहे, असे ते म्हणाले.
येत्या आठवडाभरात नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील, असे शहा म्हणाले. (प्रतिनिधी)