Kolhapur- आजरा परिसराला विजेच्या कडकडाटासह वळीवाने झोडपले, वीज पडून महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 04:37 PM2023-04-07T16:37:07+5:302023-04-07T16:43:25+5:30
व्यापाऱ्यांसह नागरिकांची उडाली तारांबळ
सदाशिव मोरे
आजरा : जोरदार वारे व विजेच्या कडकडाटासह वळीवाच्या पावसाने आजरा परिसराला झोडपून काढले. आजऱ्याच्या आठवडा बाजार दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. हत्तिवडे येथे वीज पडून वीटभट्टीवर काम करणारी एक महिला जखमी झाली. अनसाबाई श्रीकांत चव्हाण (वय ३६, मुळगाव अलिबाद, जि. विजापूर कर्नाटक) असे जखमी महिलेचे नाव आहे.
दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट व मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाने आजर्याचा आठवडा बाजार ही दुपारीच संपला. वाऱ्यामुळे पिकलेल्या काजूसह ओला काजू व मोहोरही पडला आहे. पावसाच्या पाण्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या पावसाने हत्तिवडे, होनेवाडी, सुलगाव, चांदेवाडी येथील वीट भट्टी व्यवसायिकांचेही नुकसान झाले. भट्टीच्या ठिकाणी सर्वत्र पाणी तुंबले होते. मलिग्रे, गवसे व मसोली परिसरात मोठा पाऊस झाला. हा वळीवाचा पाऊस शेतीच्या मशागतीला उपयुक्त ठरणार आहे. पावसानंतर हवेत गारवा जाणवत होता.
हत्तिवडे येथील कृष्णा हरेर यांच्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या अनसाबाई चव्हाण यांच्या अंगावर विजेच्या ज्वाला पडल्याने मान व चेहरा भाजला. पडलेली वीज प्रथम वीज वितरणच्या तारेवर पडून त्याच्या खाली काम करणाऱ्या अनसाबाई या महिलेला ज्वाला भाजल्या आहेत. जखमी अनसाबाई यांच्यावर आजरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती माजी सरपंच सुहास जोंधळे यांनी दिली.