काेल्हापूरात पावसाचा जोर वाढला; २१ बंधारे पुन्हा पाण्याखाली
By राजाराम लोंढे | Published: July 14, 2024 02:10 PM2024-07-14T14:10:14+5:302024-07-14T14:10:57+5:30
धरणक्षेत्रात धुवांधार
राजाराम लोंढे, कोल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळ पासून पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सुरु असून धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळत आहे. ओढे-नाले तुडूंब वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी दुपारपर्यंत दोन फुटाने वाढली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतिक्षा होती. शनिवारी रात्रीपासून पाऊस सुरु झाला, रविवारी सकाळ पासून जोर काहीसा वाढला असून दिवसभर संततधार सुरु आहे. धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळत असल्याने धरणसाठ्यात वाढ होत आहे. पुर्ण क्षमतेने भरलेल्या धरणातून विसर्ग वाढला आहे. त्यातच राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १३०० घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने सर्वच नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे. रविवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी १८ फुटापर्यंत होती, दुपारी दीड वाजता २० फुटापर्यंत पोहचली होती. दुपारनंतर पाण्याचा वेग वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाच ‘सर्कल’मध्ये अतिवृष्टी
रविवारी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात ‘करंजफेण’, ‘आंबा’, ‘मलकापूर’, गगनबावडा व कडगाव या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे.