कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, महापुराचा धोका कायम; दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत अर्ध्या फुटाने वाढ
By राजाराम लोंढे | Published: July 27, 2024 05:48 PM2024-07-27T17:48:13+5:302024-07-27T17:49:05+5:30
शिरोळ तालुक्याला पुराचा विळखा, एसटीचे २९ मार्ग बंद
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने विसर्ग कायम राहिल्याने पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात केवळ अर्ध्या फुटाने वाढली असून, पूरग्रस्तांच्या स्थलांतराचे काम वेगाने सुरू केले आहे. शिरोळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाड परिसरात पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. पाऊस जरी कमी झाला असला, तरी प्रशासन सतर्क असून, पुराच्या पातळीवर नजर ठेवून आहे.
शुक्रवार सकाळी उघडीप दिली आणि दुपारपासून पावसाने जोरदार सुरुवात केली होती. रात्रभर पाऊस राहिला, पण शनिवारी सकाळपासून उघडीप दिली आहे. दिवसभरात पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी पुराच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ सुरूच आहे. काेल्हापूर शहरातील अनेक भागांत जयंती नाल्याचे पाणी घुसले असून, आंबेवाडी, प्रयाग चिखली, वरणगे, आरे या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे. पाणी वाढेल तसे, नागरिकांचे स्थलांतर सुरूच राहिले आहे.
दरम्यान, दिवसभरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काेल्हापूर शहरासह शिरोळ तालुक्यातील पूरबाधित गावांना भेटी देऊन प्रशासनाला सूचना दिल्या.
रविवारसाठी ‘यलो’ अलर्ट
शनिवारी पाऊस कमी झाला असून, उघडणार कधी? याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. रविवारी (दि. २८) हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
अलमट्टीतून ३ लाखांचा विसर्ग
कोल्हापुरातील पुराची तीव्रता अलमट्टी धरणातील विसर्गावर अवलंबून असते. शनिवारी या धरणातून प्रतिसेकंद ३ लाख घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने कर्नाटक सरकारच्या सतत संपर्कात आहेत.
जिल्ह्यात ६० हजार लिटर दूध घरात
जिल्ह्यात शनिवारी वाहतुकीचे बुहतांशी मार्ग बंद राहिल्याचा परिणाम दूध वाहतुकीवर झाला आहे. सरासरी ६० हजार लिटर दूध शेतकऱ्यांच्या घरातच राहिले असून, यामध्ये ‘गोकुळ’ दूध संघाला मोठा फटका बसला आहे.
पडझडीत दोन कोटींचे नुकसान
जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत चार सार्वजनिक, तर ४५० खासगी मालमत्तांची पडझड झाली होती. यामध्ये तब्बल २ कोटी २ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
एसटीचे २९ मार्ग बंद
महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने शनिवारी एसटीचे २९ मार्ग बंद राहिले आहेत. गडहिंग्लज व इचलकरंजी आकारातील एसटी बसचे मार्ग सर्वाधिक बंद आहेत.
दृष्टिक्षेपात शनिवारचा पाऊस
- दिवसभरातील सरासरी पाऊस : ३५ मिलिमीटर
- पंचगंगेच्या पातळीत वाढ : अर्ध्या फुटाने
- सध्याची पातळी : ४७.६ फूट
- बंधारे पाण्याखाली : ९८
- मार्ग बंद : ८८
- नुकसान : ४५३ मालमत्ता
- नुकसानीची रक्कम : २ कोटी २ लाख ८५ हजार.