सकाळी पाऊस, दुपारनंतर उघडीप
By admin | Published: June 26, 2015 01:05 AM2015-06-26T01:05:05+5:302015-06-26T01:05:05+5:30
शहरातील चित्र : पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ; जिल्ह्यातील २६ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : सकाळी पाऊस आणि दुपारनंतर उघडीप असे वातावरण शहर आणि परिसरात राहिले. मात्र, तळकोकणात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे जिल्ह्यातील कोल्हापूर पद्धतीचे २६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ५३३ मिलिमीटर पाऊस झाला
आहे.
गेले दोन दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. उन्हाळ्यात वारंवार झालेला वळीव व दोन दिवसांपासून पडणारा जोरदार पाऊस यांमुळे नदी, ओढे भरून वाहत आहेत. सखल भागांत पाणी तुंंबले आहे. हवेत कमालीचा गारठा आहे. पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. शेतकरी शेतात थांबलेले पाणी बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. भाताच्या रोपलागणीला वेग आला आहे. गुरुवारी सकाळी ११ पर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. तीन दिवसांनंतर दुपारी उन्हाचे दर्शन झाले. ढगाळ वातावरण व वारा यांमुळे गारठा कायम राहिला.
गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर गेल्याने काठावरील मंदिरांत पाणी गेले आहे. त्याचबरोबर भोगावती, कुंभी, कासारी, वारणा, वेदगंगा, हिरण्यकेशी नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, शिंगणापूर; तर भोेगावती नदीवरील हळदी, राशिवडे, खडक कोगे, सरकारी कोगे आणि कासारी नदीवरील कांटे, पेंडाखळे, करंजफेण, बाजारभोगाव, यवलूज, ठाणे, आळवे, पुनाळ, तिरपण; तर वेदगंगा नदीवरील बस्तवडे, चिखली, कुरणीतील तीन, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, वारणा नदीवरील माणगाव, चिंचोली, कोडोलीतील दोन असे २६ बंधारे पाण्याखाली आहेत. या मार्गांवरील वाहतूूक पर्यायी मार्गांनी सुरू आहे.
पावसाचा ‘महावितरण’ला फटका...
गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने वीजवाहिन्यांवर झाडे व फांद्या पडणे, खांब उन्मळून पडणे यांमुळे महावितरणाला फटका बसला आहे. आठ दिवसांत पावसामुळे विभागातील ७११ खांब कोसळले. यातील ४६० खांब पुन्हा उभे करण्यात आले. १३४ खांब व १० रोहित्रे उभी करण्याचे काम सुरू आहे. खांब पडल्याने व विद्युत तारा तुटल्याने संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित होत आहे. शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरू करण्याचा ‘महावितरण’ प्रयत्न करीत आहे.
घटप्रभा ‘फुल्ल’
घटप्रभा धरणातून प्रतिसेकंद ३७१३ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोदे लघू पाटबंधारे प्रकल्प ८० टक्के भरला आहे. राजाराम बंधाऱ्यातून ३३६०८, सांगली बंधाऱ्यातून २५१६४, अंकली बंधाऱ्यातून ४८५२०, राजापूर बंधाऱ्यातून ६२२१० घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) हातकणंगले - ६.३, शिरोळ - ३.३, पन्हाळा - ३८, शाहूवाडी - ५१, राधानगरी - ६१.२, गगनबावडा - १२५, करवीर - १५.६, कागल - २१.९, गडहिंग्लज - २५.३, भुदरगड - ३६, आजरा - ६५.८, चंदगड - ८४.७.