प्रारुप मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:03 AM2021-02-20T05:03:52+5:302021-02-20T05:03:52+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होणार असल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने तयारी सुरू ...

Rain of objections on draft voter lists | प्रारुप मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

प्रारुप मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

Next

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होणार असल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मंगळवारी ८१ प्रभागांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आणि त्यातील चुका पाहून अनेक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते चक्रावून गेले आहेत. पाचशे ते दीड हजार मतदारांची नावे एक प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मतदार यादीचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचे स्पष्ट होत आहे.

बिंदू चौक प्रभागातील ७६९ मतदारांची नावे ही शेजारच्या प्रभाग क्रमांक ३१ बाजारगेट या प्रभागात समाविष्ट झाली आहेत. तसेच १४५४ मतदारांची नावे ही प्रभाग क्रमांक २७ ट्रेझरीला जोडली गेली आहेत. प्रभागाच्या हद्दीमध्ये कोणताही बदल झाला नसताना इतकी नावे एक प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी हरकत घेतली आहे.

राजारामपुरी विभागीय कार्यालयांतर्गत बुद्ध गार्डन प्रभागात एकूण ४५०० मतदारांचा समावेश असून त्यातील ३१०० नावेच प्रारूप मतदार यादीत दिसतात. अन्य नावे शेजारच्या प्रभागांत विभागली गेली आहेत. १५० हून अधिक मृतांची नावे आहेत, तर ११२ मतदारांची नावे डबल झाली आहेत.

- शिवाजी मार्केट कार्यालयाच्या चुका

शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाकडून मोठ्या चुका झाल्याची बाब समोर आली आहे. सर्वाधिक ७५ हरकती याच प्रभागातील आहेत. या विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण असून त्यांच्या कामाबाबत अधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा नाराजी व्यक्त केली आहे. प्रारूप मतदार याद्या तयार करण्यातही त्यांच्याकडून हलगर्जीपणा झाला असल्याचे हरकतींवरून स्पष्ट होत आहे.

- प्राप्त हरकतींची संख्या अशी -

- गांधी मैदान कार्यालय - १४

- शिवाजी मार्केट कार्यालय - ७५

- राजारामपुरी कार्यालय - १

- ताराराणी मार्केट कार्यालय - २

- सुट्टीच्या दिवशीही हरकती स्वीकारणार

आज, शुक्रवारपासून महापालिकेला सलग तीन दिवस सुट्ट्या आहेत. परंतु तक्रारी, हरकतींची संख्या लक्षात घेता आणि अंतिम मतदार यादी तयार करण्याचा कालावधी कमी असल्यामुळे तिन्ही दिवस सुट्टी असूनही कामकाज चालणार आहे. हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. ज्या हरकती योग्य आहेत, त्यांची दुरुस्तीही करण्यात येणार आहे.

Web Title: Rain of objections on draft voter lists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.