कोल्हापूर जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही परतीच्या पावसाने झोडपले, पिकांचे नुकसान
By संदीप आडनाईक | Published: September 24, 2024 06:34 PM2024-09-24T18:34:51+5:302024-09-24T18:36:51+5:30
गगनबावड्यात सर्वाधिक पाऊस
कोल्हापूर : जिल्ह्यात आज, मंगळवारी दिवसभर अनेक ठिकाणी परतीचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे हवेत काहीसा गारवा तयार झाला असला तरी अनेक ठिकाणी काढणी केलेल्या पिकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी ७.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात सर्वाधिक १८.४ मिलिमीटर तर भुदरगड तालुक्यात त्या खालोखाल १३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. पुढील तीन आठवडे अर्थातच १० ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता असून, राज्यात परतीचा पाऊस यंदा फारच बरसण्याची शक्यता आहे.
अतिवायव्य राजस्थान आणि कच्छ परिसरातून वायव्य वारा, खालावणारी आर्द्रता आणि इतर काही वातावरणीय बदल यामुळे राज्यात सर्वत्र पावसाने जोर पकडलेला आहे. घाटमाथ्यावरही मंगळवारी परतीच्या पावसाने जोरदार झोडपले. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात १८.४ पावसाची नोंद झाली आहे. भुदगरड, राधानगरी, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, तसेच गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील ११ धरण क्षेत्रांत पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावली.
दुसऱ्या आवर्तनातील पावसाची ही सुरुवात असल्याने जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली. सकाळपासून रात्रीपर्यंत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. इचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी तासभर पावसाने झोडपून काढले. त्यामुळे परिसर जलमय झाला. या पावसामुळे शेती मशागती आणि खरीप पीक काढणी कामाचा उरक शेतकऱ्यांनी वाढवला आहे.
शहरात पाणीच पाणी; नागरिकांची तारांबळ
कोल्हापूर शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले हाेते. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. या पावसामुळे नागरिकांसह वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली.