पावसाने कोल्हापूरला झोडपले
By admin | Published: September 11, 2015 01:01 AM2015-09-11T01:01:29+5:302015-09-11T01:01:29+5:30
अडीच तास संततधार : सगळीकडे पाणीच पाणी; पादचारी, फेरीवाल्यांची तारांबळ
कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ््यात झाला नाही इतक्या जोरदार पावसाने गुरुवारी दुपारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यालाही झोडपून काढले. राधानगरी किंवा गगनबावडा या पावसाचे आगर असलेल्या ठिकाणी जसा पाऊस काहूर माजवतो, तसाच पाऊस शहरात झाला. पाण्याचे लोट रस्त्यावरून वाहत होते. या पावसाने धरणीमातेची कुस खऱ्या अर्थाने तुडुंब भरली. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे.
गुरुवारी सकाळपासून आकाश ढगाळलेले होते. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल, असे वातावरण होते. सुरुवातीला साडेअकराच्या सुमारास शहराच्या काही भागात चांगला पाऊस झाला, परंतु त्याचे स्वरूप वळीव पावसासारखे होते. त्यानंतर थोडी उघडीप होती, परंतु पुन्हा साडेतीनच्या सुमारास आभाळ ढगांनी गच्च भरून आले. पाऊस कसा येणार याचीच चाहूल त्यातून लागली. चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला. आभाळ पुरते अंधारून आले होते. कोकणात किंवा जास्त पावसाच्या प्रदेशात जसे दिवसभर वातावरण असते तसेच काहीसे वातावरण कोल्हापुरात तयार झाले होते. पावसाच्या नुसत्या सरी नव्हत्या, तर त्याने चांगलेच झोडपून काढले. रस्त्यावरून, घरावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते. शहराच्या बहुतांशी भागात रस्त्यावर पाणी तुंबले होते, गटारी भरून वाहत होत्या. रस्त्यावरील गर्दी एकदम कमी झाली होती. कुठे पाहावे तिकडे नुसता पाऊस आणि पाऊसच दिसत होता.
अशाच पावसाची लोकांना प्रतीक्षा होती.
साडेसहा वाजेपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. पादचारी, फेरीवाले, दुचाकीस्वार यांची तारांबळ उडाली. त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला. अनेकांनी विक्रीचे साहित्य गुंडाळून चिंब अंगाने घरी जाणेच पसंत केले.