तांबाळे परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:23 AM2021-04-14T04:23:19+5:302021-04-14T04:23:19+5:30
तांबाळे परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने व वादळी वाऱ्याचा तडाख्याने फातिमा राईस मिलवरील पत्रे उडून दोनशे मीटर अंतरावर ...
तांबाळे परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने व वादळी वाऱ्याचा तडाख्याने फातिमा राईस मिलवरील पत्रे उडून दोनशे मीटर अंतरावर पडले. यामुळे कांडपासाठी मिल, भात, तांदुळ आणि कोंडा यांचे अंदाजे दहा लाखाचे नुकसान झाले आहे. वादळाचा जोर इतका भयानक होता की, नूतन पोतदार यांच्या काजू फॅक्टरीवरील पत्रे कैचीसह रस्त्याच्या पलीकडे जवळ-जवळ पाचशे फुटावर जाऊन पडले. यामध्ये अंदाजे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. तांबळेश्वर हायस्कूलचे छत उडून गेल्याने संगणक कक्ष आणि व्हरांडा यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच युवराज मोहिते, हरिष देसाई, रामचंद्र थवी, फर्नांडिस, मायकल डिसूजा यांच्या घरांवरील पत्रे व कौले उडून, तसेच आजुबाजूची झाडे पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आर्या कापड दुकानावरील छत उडून कपड्यांचे नुकसान झाले आहे, तर बशाचा मोळा येथील पांडुरंग पाटील यांच्या घरावर फणसाचे झाड पावसामुळे पडले आहे.
दोन दिवसामागे तांबाळे परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने घरे व दुकानाचे नुकसान झाले होते. आज पुन्हा मोठ्या प्रमाणात वादळ झाल्याने मठगांव, अतुर्ली, तांबाळे, बशाचा मोळा या गावांंतील घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीने सर्वसामान्य लोकांचे आर्थिक नुकसान झाल्याने शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांकडून होत आहे.
वादळी वारे व गारपिटीने रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली आहेत. विद्युत खांब कोसळल्याने अनेक भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता.
फोटो -
वादळाच्या तडाख्याने राईस मिलवरील व श्री तांबळेश्वर हायस्कूलचे पत्रे उडून लाखो रुपयांचे नुकसान.