राधानगरीत अतिवृष्टी; धरणाचे पाच दरवाजे उघडले
By admin | Published: October 10, 2016 12:51 AM2016-10-10T00:51:32+5:302016-10-10T00:51:32+5:30
शेतकऱ्यामध्ये चिंता : दसऱ्याच्या उत्साहावर पाणी
राधानगरी : राधानगरी तालुक्यात रविवारी पावसाने कहर केला. दाजीपुरात सायंकाळी साडेपाचपर्यंत आठ तासांत तब्बल १२६ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे दसऱ्याच्या उत्साहावर पाणी फिरले. तसेच काढणीला आलेल्या भात व अन्य पिकांवर पावसाचा विपरीत परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यामध्ये चिंता व्यक्तहोत आहे. दाजीपूर परिसरातील जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे सुरू झाले. दोन्ही वीज केंद्रातून वीजनिर्मिती सुरू करण्यात आली.
रविवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ झाले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अशीच स्थिती असल्याने थोड्या प्रमाणात पाऊस होईल, असा अंदाज होता. मात्र, दुपारी अचानक मोठ्या पावसाला सुरुवात झाली. धरण क्षेत्रात दाजीपूर परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी वाढू लागली. दुपारी पावणेतीन वाजता खासगी जल विद्युतनिर्मिती केंद्रातून १६०० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला. तीन वाजता एक दरवाजा सुरू झाला. पुन्हा पंधरा मिनिटांत दोन, त्यानंतर पाच मिनिटांत आणखी दोन दरवाजे सुरू झाले. सायंकाळी पाच वाजता महाजनकोच्या वीजनिर्मिती केंद्रातून ४०० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला. यावेळी एकूण ९२०० क्युसेक्स विसर्ग सुरू होता. यामुळे नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली.
आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच या दिवसात धरणाचे दरवाजे सुरूझाले. आतापर्यंत योग्य प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाची पिके चांगली आली आहेत. भाताची कापणी सुरू झाली आहे. दसरा झाल्यावर या कामांना वेग येणार आहे. मात्र, रविवारच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. घटस्थापनेपासून पाऊस तुरळक प्रमाणात सुरू आहे. मात्र, रविवारी त्याचा जोर वाढला. दसऱ्याच्या कार्यक्रमावरही या पावसामुळे व्यत्यय आला. (प्रतिनिधी)