गगनबावड्यात पावसाचा जोर, कोल्हापूर जिल्ह्यात २१.८९ मि.मी. पाऊस : नऊ बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 05:44 PM2018-07-05T17:44:34+5:302018-07-05T17:46:55+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, शाहूवाडी व राधानगरी तालुक्यांत गुरुवारी जोरदार पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात पडला. उर्वरित तालुक्यांसह कोल्हापूर शहरामध्ये दिवसभर रिमझिम सुरू राहिली.
कोल्हापूर : जिल्ह्यात गगनबावडा, शाहूवाडी व राधानगरी तालुक्यांत गुरुवारी जोरदार पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात पडला. उर्वरित तालुक्यांसह कोल्हापूर शहरामध्ये दिवसभर रिमझिम सुरू राहिली. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन ‘राजाराम’सह नऊ बंधारे पाण्याखाली गेले. पंचगंगेच्या पाणीपातळीत गुरुवारी वाढ होऊन ती २० फूट पाच इंचांवर गेली.
गुरुवारी सकाळपासूनच शहरासह आसपासच्या तालुक्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. गगनबावडा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याखालोखाल शाहूवाडी व राधानगरी तालुक्यांत पाऊस पडला. उर्वरित तालुक्यांत पावसाचा जोर नसला तरी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू राहिली. शहरातही हेच चित्र होते. पावसाचे वातावरण राहिल्याने हवेत गारठाही जाणवत होता.
राधानगरी, दूधगंगा, कुंभी, घटप्रभा अशा प्रमुख धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. पंचगंगेच्या पाणीपातळीत बुधवार (दि. ४)च्या तुलनेत तीन फूट पाच इंचांनी वाढ होऊन गुरुवारी ती २० फूट पाच इंचांवर गेली.
गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २१.८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ७४.५० मि.मी., तर सर्वांत कमी पाऊस शिरोळ तालुक्यात १.८५ मि.मी. झाला.
जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे बंधारे, भोगावती नदीवरील खडक-कोगे व कासारी नदीवरील यवलूज या बंधाऱ्यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा
हातकणंगले (७.२५), शिरोळ (१.८५), पन्हाळा (१९.४३), शाहूवाडी (३८.८३), राधानगरी (३१.८३), गगनबावडा (७४.५०), करवीर (७.१८), कागल (१६.२८), गडहिंग्लज (७.७१), भुदरगड (१२.४०), आजरा (२३.७५), चंदगड (२१.६६).
‘शित्तूर’मध्ये जनावराच्या शेडचे दहा हजारांचे नुकसान
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ वारुण येथील धोंडिराम दादू यटम यांच्या जनावराचे शेड कोसळून, शेळीचा मृत्यू होऊन अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले.