पावसामुळे ६० टक्के व्यवसायांना फटका-खरेदीच्या उत्साहावर पाणी, फेरीवाल्यांची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 11:52 AM2019-10-26T11:52:42+5:302019-10-26T11:53:29+5:30

दिवाळीला एक दिवस बाकी असताना अपेक्षित व्यवसाय होत नसल्यामुळे व्यापारी, फेरीवाले कर्जाच्या खाईत लोटले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Rainfall hit 5 percent of businesses | पावसामुळे ६० टक्के व्यवसायांना फटका-खरेदीच्या उत्साहावर पाणी, फेरीवाल्यांची स्थिती

पावसामुळे ६० टक्के व्यवसायांना फटका-खरेदीच्या उत्साहावर पाणी, फेरीवाल्यांची स्थिती

Next
ठळक मुद्देमुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे.

कोल्हापूर : महापुरातून सावरत असणाऱ्या व्यापारी, फेरीवाल्यांचे परतीच्या पावसामुळे पुन्हा कंबरडे मोडले आहे. ऐन दिवाळीच्या हंगामामध्येच सलग चार दिवस पडणाºया पावसाने किरकोळ विक्रेत्यांसह बड्या व्यापाऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ६० टक्के व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. यामध्ये राजारामपुरी, शाहूपुरीबरोबरच महाद्वार रोड, ताराबाई रोड आणि पापाची तिकटी येथील विक्रेत्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच चक्रीवादळामुळे कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या पावसाचा फटका ज्याप्रमाणे शेतक-यांना बसत आहे, त्याप्रमाणेच शहरी भागातील किरकोळ, घाऊक विक्रेत्यांनाही बसत आहे. ऐन दिवाळीवेळीच कोसळणा-या पावसामुळे व्यापा-यांबरोबरच फेरीवाले हवालदिल झाले आहेत. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुरामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. दिवाळीमध्ये यामधील काहीअंशी तोटा भरून निघेल, अशी त्यांना अपेक्षा होती; परंतु मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे. दिवाळीला एक दिवस बाकी असताना अपेक्षित व्यवसाय होत नसल्यामुळे व्यापारी, फेरीवाले कर्जाच्या खाईत लोटले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पत्र्याचे शेड मारण्याची वेळ
दरवेळी दिवाळीमध्ये महाद्वार रोडवरील विके्रते दुकानाबाहेर मंडप घालतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानाला आकर्षक सजावटीसोबत विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, दिवसरात्र सुरू असलेल्या पावसामुळे विक्रीसाठी आणलेला माल भिजत आहे. यावर पर्याय म्हणून काहींनी मंडपावर पत्र्याची शेड उभारली आहेत.

 

फायद्यापेक्षा तोटाच जास्त
दिवाळीच्या अगोदर पाच दिवस ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडतात. या कालावधीत दरवर्षी दररोज १० हजारांचा गल्ला जमा होत असे. यावेळी पावसामुळे ग्राहकांची संख्या कमी झाल्याने दोन हजार रुपयेही व्यवसाय होत नाही. महापुरात सलग १५ दिवस व्यवसाय बंद ठेवावा लागला. दिवाळीसाठी कर्ज काढून माल आणला आहे. अपेक्षित उठाव होत नसल्यामुळे फायद्यापेक्षा तोटा जास्त होत आहे.
- एकनाथ लक्ष्मण पाटील, फेरीवाले, महाद्वार रोड
 

 

६० टक्के व्यवसायाला फटका
शहरामध्ये अगोदरच स्पर्धा आहे. तसेच दिवाळीच्या खरेदीसाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने गांधीनगरला जात आहेत. यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशी बिकट परिस्थिती असतानाच ऐन हंगामावेळी पावसाने हजेरी लावल्याने दरवर्षीच्या तुलनेत ६० टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे.
- अरविंद भेदा, टॉप अँड टाऊन
 

 

दिवाळीतील खप घटला
दरवर्षी दिवाळीला काही पैसे हातात पडतील, या आशेने महाद्वार रोड येथे व्यापारासाठी येतो. यंदाच्या वेळी पावसामुळे ग्राहक स्टॉलच्या ठिकाणी थांबायलाच तयार नाहीत. दरवर्षीच्या तुलनेत १० टक्केही व्यवसाय होत नाही. याचा खपावर परिणाम झाला आहे. दिवाळीसाठी एक दिवसाचा अवधी बाकी असून, या दिवसात खरेदी केलेला सर्व माल खपेल याची शाश्वती नाही.
- राजेंद्र धर्मराज पांढरे, फेरीवाले
 

 

हंगाम तोट्यात जाणार
पावसामुळे दरवर्षीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर महापुराचा परिणामही व्यवसायावर होत आहे. दरवेळी दोन हजारांची खरेदी करणारा ग्राहक एक हजाराचीच खरेदी करीत आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४० टक्केही व्यवसाय झालेला नाही. परिणामी हंगाम तोट्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
- मेघा इंगवले, गुरुकृपा कलेक्शन, ताराबाई रोड
 

 

Web Title: Rainfall hit 5 percent of businesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.