कोल्हापुरात पावसाची उघडझाप; राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग, २७ बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 01:50 PM2024-07-18T13:50:11+5:302024-07-18T13:52:00+5:30
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
कोल्हापूर : जिल्ह्यात काल, बुधवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. तर रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र, धरणक्षेत्रातहीपाऊस कमी असल्याने नद्यांच्या पातळीत घसरण होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात अडीच फुटांनी कमी झाली. अद्याप २७ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ९६.९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
पावसाचे रोज वातावरण बदलत असून, कधी उघडीप तर कधी रिपरिप असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. बुधवारी सकाळपासून पावसाने सुरुवात केली. सकाळी दहानंतर उघडीप दिली, दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही पाऊस कमी आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १४०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घसरण होत आहे. पंचगंगा नदीची पातळी बुधवारी सकाळी २५.६ फुटांपर्यंत होती, ती सायंकाळी २३ फुटांपर्यंत खाली आली होती. दिवसभरात अडीच फुटांनी पाणी कमी झाल्याने सध्या २५ बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत १७ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ४ लाख ४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पंचगंगा नदीवरील २७ बंधारे पाण्याखाली
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, वेदगंगा नदीवरील- चिंचोली व माणगांव, हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजार भोगाव, वारणा नदीवरील -चिंचोली, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडुकली व सांगशी असे एकूण २७ बंधारे पाण्याखाली आहेत.
धरणांमधील पाणीसाठा
राधानगरी ५.०८ टीएमसी, तुळशी २.०४ टीएमसी, वारणा २१.५० टीएमसी, दूधगंगा ११.९३ टीएमसी, कासारी १.९४ टीएमसी, कडवी २.०१ टीएमसी, कुंभी १.४७ टीएमसी, पाटगाव २.८० टीएमसी, चिकोत्रा ०.६९ टीएमसी, चित्री १.४१ टीएमसी, जंगमहट्टी १.१९ टीएमसी, घटप्रभा १.५६ टीएमसी, जांबरे ०.८२ टीएमसी, आंबेआहोळ १.०७ टीएमसी, सर्फनाला ०.३१ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प ०.२१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी
राजाराम २२.५ फूट, सुर्वे २२ फूट, रुई ५१.२ फूट, इचलकरंजी ४८.७ फूट, तेरवाड ४४ फूट, शिरोळ ३४.६ फूट, नृसिंहवाडी ३१ फूट, राजापूर २०.१० फूट तर नजीकच्या सांगली १० फूट व अंकली १२ फूट अशी आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण ४२.४ मिमी पाऊस
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ९६.९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- २४.१ मिमी, शिरोळ -१२.६ मिमी, पन्हाळा- ४९.३ मिमी, शाहुवाडी- ७५ मिमी, राधानगरी- ५९.५ मिमी, गगनबावडा- ९६.९ मिमी, करवीर- २९.३ मिमी, कागल- ३९.७ मिमी, गडहिंग्लज- ३१.१ मिमी, भुदरगड- ६३.५ मिमी, आजरा- ४३.८ मिमी, चंदगड- ४७.३ मिमी असा एकूण ४२.४ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.