कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, २ हजार ८२८ क्युसेकने विसर्ग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 15:54 IST2023-07-29T12:19:40+5:302023-07-29T15:54:07+5:30
पुन्हा धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता, पंचगंगेच्या पातळीत तीन इंचांची वाढ

कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, २ हजार ८२८ क्युसेकने विसर्ग सुरू
कोल्हापूर : जिल्ह्यात काल शुक्रवार पासून पावसाचा जोर ओसरला असून, नद्यांची पाणी पातळी स्थिरावली आहे. दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळीत केवळ ३ इंचांची वाढ झाली असून, ५३ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक काहीशी ठप्पच आहे. आगामी दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘यलो’ अलर्ट दिल्याने पाऊस कमी होईल असा अंदाज आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर केर्ली (ता. करवीर) येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने काल, शुक्रवारी या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू होती.
धरण परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी पाण्याची आवक सुरु असल्याने आज, शनिवारी पुन्हा राधानगरीधरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला. दुपारी १.१५ मिनिटांनी क्रमांक ६ हा दरवाजा खुला झाला. यातून १४२८ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. तर पॉवर हाऊसमधून १४०० क्युसेक असा एकूण २८२८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
गुरुवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीची पातळी वाढू लागल्याने नागरिक चांगलेच धास्तावले होते. राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले राहिल्याने विसर्ग वाढल्याने पंचगंगा धोका पातळी गाठणार असे वाटत असतानाच अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवल्याने नद्यांची पातळी संथगतीने वाढत गेली. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे राधानगरी धरणाचे पाच ही दरवाजे बंद झाले. शुक्रवार पहाटे एक दरवाजा तर सायंकाळी ७:३० नंतर चार ही स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने विसर्ग कमी झाला होता. आज शनिवारी दुपारी पुन्हा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाल्याने पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
महापुराचा धोका सध्यातरी कमी दिसत आहे. पुराच्या भीतीपोटी कोल्हापूर शहरातील स्थलांतरित केलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी सोडण्यास सुरुवात झाली असली तरी काही नागरिक आपल्या मूळ घरात जात नाहीत.
पडझडीत १२.४२ लाखांचे नुकसान
शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात विविध ठिकाणी ३८ खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये १२ लाख ४२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
अद्याप ३३ मार्ग बंदच
जिल्ह्यातील विविध नद्यांना आलेल्या पुरामुळे राज्य मार्ग १० व प्रमुख जिल्हा मार्ग २३, असे ३३ मार्ग बंद आहेत. त्याशिवाय एसटीचेही अनेक मार्ग बंद राहिले आहेत.