कोल्हापुरात पावसाची उघडझाप; पूर पाणीपातळीत घसरण; राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 11:46 AM2024-08-05T11:46:31+5:302024-08-05T11:47:06+5:30
अद्याप ५५ मार्ग पाण्याखाली : पिके सलग दहा दिवस पाण्यात
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची उघडझाप राहिली. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. सद्या धरणातून प्रतिसेकंद १५०० घनफूट विसर्ग सुरु आहे. पाऊस कमी झाल्याने पंचगंगा नदीची पातळी हळूहळू कमी होत असून, ४०.५ फुटांपर्यंत आली आहे. नदीकाठची पिके सलग आठ दिवस पाण्याखाली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गेली दोन दिवस पाऊस काहीसा कमी आहे, तरीही दिवसभर उघडझाप असली, तरी रात्री अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. रविवारी सकाळी काहीकाळ ऊन पडले होते. दुपारनंतर पुन्हा जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. सद्या धरणातून प्रतिसेकंद १५०० घनफूट विसर्ग सुरु आहे. वारणेतून ११ हजार ५७०, दूधगंगेतून ९ हजार २५० घनफूट पाणी बाहेर पडत असल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. साधारणत: तासाला एक इंचाने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. नदीकाठची ऊस, भात, सोयाबीन पिके दहा दिवस पाण्याखाली असल्याने मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतित आहे.
अद्याप ६८ बंधारे पाण्याखाली असल्याने एसटीचे २० मार्ग बंद आहेत, १० राज्य, तर ४५ प्रमुख जिल्हामार्ग, असे ५५ मार्ग बंद आहेत.
पडझडीत २२ लाखांचे नुकसान
जिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ७५ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये २२ लाख २३ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पाणी संथगतीने कमी
दिवसभरात पाऊस कमी झाला असला, तरी पुराचे पाणी एकदम संथगतीने कमी होत आहे. रविवारी दिवसभरात केवळ ६ इंचांनी पुराचे पाणी कमी झाले होते.
दृष्टिक्षेपात पाऊस :
सध्याची पातळी : ४०.५ फूट
बंधारे पाण्याखाली : ५८
मार्ग बंद : ५५
नुकसान : ७५ मालमत्ता
नुकसानीची रक्कम : २२ लाख २३ हजार