Rain Update Kolhapur: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगा पात्राबाहेरच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 11:13 AM2022-07-06T11:13:57+5:302022-07-06T11:23:55+5:30
संभाव्य पूर परिस्थिती पाहून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, आजपासून नदी काठच्या गावांचे स्थलांतर करण्यास सुरुवात होणार आहे.
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसापासून जोरदार बरसणाऱ्या वरुणराजाने आज, बुधवारी सकाळपासून उघडीप घेतली आहे. मात्र, जिल्ह्यात काल, मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. गगनबावड्यासह चार तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, पंचगंगेची पाणी पातळी आज, ३१ फूट ४ इंच इतकी झाली आहे. २७ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काल, मंगळवारीच सायंकाळी ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवार सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत राहिला. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा तालुक्यात अतिवृष्टी झाली. मंगळवारी रात्रभर अति मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य महापुराची तयारी म्हणून मंगळवारी सायंकाळी ‘ एनडीआरएफ ’ च्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
आज, सकाळी पंचगंगेची पाणी पातळी ३१ फूट ४ इंच इतकी झाली आहे. इशारा पातळी ३९ फूट असून मंगळवारी सकाळी आठ ते रात्री पर्यंत पंचगंगेच्या पातळीत तब्बल ५ फुटाने तर सोमवारच्या तुलनेत तब्बल १२ फुटांची वाढ झाली. पाणी काठावर आले असून कोणत्याही क्षणी पंचगंगा पात्राबाहेर पडू शकते.
‘वारणा’ च्या पातळीत अर्धा टीएमसीची वाढ
धरणक्षेत्रात पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे पाणी पातळी वाढ होत असून सोमवार ते मंगळवार एका दिवसात वारणा धरणात तब्बल अर्धा टीएमसी पाण्याची वाढ झाली. राधानगरी धरणातून ०.२८, तुळशी मध्ये ०.०७ तर दूधगंगा धरणात ०.४२ टीएमसीने पाणी साठा वाढला आहे.
जोर वाढला तर आजपासून स्थलांतर
पावसाचा जोर वाढत गेला तर आज, बुधवारपासून पुराच्या पाण्याचा धोका असलेल्या नागरिकांचे स्थलांतर करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
जिल्ह्यातील पाऊस व संभाव्य पूर स्थितीचा आढावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला. यामध्ये महसूल यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नदी काठच्या नागरिक धास्तावले
कुंभी, कासारी, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगेसह सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे धास्तावले असून पुन्हा २०२१ च्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आहेत.
27 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग
राधानगरी धरणात 84.33 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीवरील 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
नदीकाठच्या गावांचे आजपासून स्थलांतर
संभाव्य पूर परिस्थिती पाहून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, आजपासून नदी काठच्या गावांचे स्थलांतर करण्यास सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी काल, मंगळवारी बैठकीत याबाबत माहिती दिली. . मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 1077 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.