कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप, पूरस्थिती मात्र गंभीरच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 10:52 PM2021-07-24T22:52:24+5:302021-07-24T22:52:55+5:30
Kolhapur : पावसाने उघडीप दिल्यामुळे शहरात नागरीकांनी महापूर पहाण्यासाठी पंचगंगा नदी घाटावर गर्दी केली होती, परंतु त्यांना पुलावर येण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता.
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसापासून तुफान कोसळणाऱ्या पावसाने शनिवारी शहरात परिसरात दिवसभर उघडी दिली. मात्र महापुराची परिस्थिती मात्र जैसे थे होती. शहरातील चाळीस टक्के भाग पूराच्या पाण्याने वेढलेला आहे.
कोल्हापूर शहरातील दुधाळी, उत्तरेश्वर, वाघाची तालीम, मस्कुती तलाव, शुक्रवारपेठ, पंचगंगा तालीम, सिध्दार्थनगर सीता काॅलनी, सुतारवाडा, रमणमळा,महावीर कॉलेज, कदमवाडी, जाधववाडी, मुक्तसैनिक वसाहत, बापट कॅम्प परिसरात शनिवारी दिवसभर महापुराचे पाणी स्थिर होते. पाण्याची पातळी थोडी सुध्दा उतरलेली नाही. पातळी स्थीर आहे. सुदैवाने शहरात पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. त्यामुळे महापुराची धास्ती थोडी कमी झाली.
पावसाने उघडीप दिल्यामुळे शहरात नागरीकांनी महापूर पहाण्यासाठी पंचगंगा नदी घाटावर गर्दी केली होती, परंतु त्यांना पुलावर येण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. पुराचे पाणी ज्या ज्या भागात आहे, त्याठिकाणी पोलिस व महापालिका प्रशासनाने बॅरिकेट लावून मार्ग बंद केले आहेत. महापुरामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील बहुतांशी व्यवसाय, दुकाने बंद आहेत. त्यामुळे बंदसदृश्य स्थिती होती.