कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 06:33 PM2017-08-27T18:33:40+5:302017-08-27T18:37:27+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघड-झाप राहिली. शहरात तर एक-दोनवेळेला आलेल्या पावसाच्या सरीवगळता पूर्णपणे उघडीप राहिली. धरण क्षेत्रातही पावसाची जोर कमी आल्याने राधानगरीसह इतर धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली असून पंचगंगेची पातळी १८ फुटांवर आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघड-झाप राहिली. शहरात तर एक-दोनवेळेला आलेल्या पावसाच्या सरीवगळता पूर्णपणे उघडीप राहिली. धरण क्षेत्रातही पावसाची जोर कमी आल्याने राधानगरीसह इतर धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली असून पंचगंगेची पातळी १८ फुटांवर आहे.
गेले दोन दिवस असणारा पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. रविवारी सकाळ पासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहिल्या. पण दहा वाजल्यापासून वातावरणात थोडा बदलत होत काही काळ ऊन, त्यानंतर ढग दाटून यायचे आणि पाऊस पडत राहिला.
गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, भुदरगड, आजरा, राधानगरी, चंदगड तालुक्यांत मात्र चांगला पाऊस सुरू आहे. करवीर, कागल, हातकणंगले मध्ये पाऊस कमी आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ८० मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात २५.५० मिलीमीटर झाला.
धरणक्षेत्रातही तुलनेने पावसाचा जोर कमी झाला असून धरणातून होणार विसर्गही कमी झाला आहे. राधानगरी धरण क्षेत्रात ३८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सांडव्यातून १४२८ तर वीजनिर्मितीसाठी २२०० असे ३६२८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी बाहेर सोडले जात आहे. त्यामुळे पाऊस कमी असला तरी भोगावती नदीची फूग कायम आहे. पंचगंगेची पातळी १८ फुटांवर स्थिर आहे. पंचगंगा नदीवरील सहा व भोगावतीवरील तीन असे नऊ बंधारे पाण्याखाली आहेत.
‘वारणा’ फुल्ल!
वारणा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून त्यातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद ७६१ घनफूट पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली असली तरी अद्याप दूधगंगा धरण रितेच आहे. धरण ९० टक्के भरले असून त्यातून ५२५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तालुकानिहाय पाऊस असा-
हातकणंगले - ०.१२, शिरोळ - निरंक, पन्हाळा - २.००, शाहूवाडी - १४.८३, राधानगरी - ७.८३, गगनबावडा - २५.५०, करवीर - ४.००, कागल - १.५७, गडहिंग्लज - ०.७१, भुदरगड - ८.००, आजरा - ५.५०, चंदगड - ९.८३.