कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप, धरणक्षेत्रातही पावसाचा जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:15 PM2018-08-08T17:15:41+5:302018-08-08T17:19:15+5:30
जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरीसह भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला असून नद्यांची पातळी वाढू लागली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरीसह भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला असून नद्यांची पातळी वाढू लागली आहे.
गेले दोन दिवस पावसाची उघडझाप राहिली; पण मंगळवारी रात्रीपासून पावसाची भुरभुर वाढत गेली.
बुधवारी सकाळी जिल्ह्यात एकसारख्या सरी कोसळत राहिल्या. कोल्हापूर शहरातही दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्त्यावरील वर्दळ वाढत होती; पण अचानक सरी कोसळू लागल्यानंतर मात्र वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडत होती.
धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असून विसर्गही वाढला आहे. परिणामी नद्यांची पातळी वाढत आहे. जिल्ह्यात एका घराची पडझड होऊन सुमारे ऐंशी हजारांचे नुकसान झाले आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत शाहूवाडी तालुक्यात २८, राधानगरी १५.८३ तर गगनबावडा तालुक्यात २१.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अद्याप नऊ बंधारे पाण्याखाली असून पावसाचा जोर वाढला तर नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊन आणखी बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.