आजरा तालुक्यात पावसाचा जोर मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:22 AM2021-07-25T04:22:16+5:302021-07-25T04:22:16+5:30
पुराचे पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान आजरा : आजरा तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दोन दिवसाच्या ...
पुराचे पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान
आजरा
: आजरा तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दोन दिवसाच्या पावसाने तालुक्यातील चित्री आंबेओहोळसह सर्व धरणे भरली आहेत. ओढे व नद्यांचे पाणी शेतात घुसल्याने तालुक्यातील हजारो हेक्टरवरील भात, ऊस, भुईमूग व नाचणा पिकांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी सुरात घुसल्याने १२ गावातील ६३ कुटुंबे व २६४ नागरिकांना स्थलांतरित तर जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने ११६ जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आली आहेत. घरांची पडझड होऊन १७ लाखांचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने हाजगोळी बंधाऱ्याशेजारी रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. चित्री धरणात दोन दिवसात ४० टक्के पाणी साठा होऊन १०० टक्के भरले आहे.
गजरगाव गावाला अद्यापही बेटाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. चाफवडे येथील नव्याने बांधलेल्या पुलाचा दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे ८० कुटुंबांचा गावांशी संपर्क तुटला आहे. कुक्कुटपालन शेडमधील अंदाजे १० ते १२ हजार कोंबड्या पाणी शिरल्याने दगावल्या आहेत. तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्याने बंधाऱ्यावरील पाणी पातळी कमी होत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही आजरा तालुक्यातील एसटी सेवा बंद होती.
२४ आजरा हाजगोळी
फोटोकॅप्शन - हाजगोळी ( ता.आजरा ) बंधाऱ्याशेजारी पुराच्या पाण्याने रस्त्यावर पडलेला खड्डा.